Site icon kanokannews

well-known Latest Maratha Reservation : मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 1

 

well-known Maratha Reservation

मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ?
मराठ्यांचे पानिपत होईल का ?

(मराठा समाज,वाटचाल जबाबदारी आव्हाने ते आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय या सर्व घडामोडींचा आढावा घेणारी लेखमाला.)
भाग – 1 – आरक्षण आणि वळणांचा प्रवास.
मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राला काही नवीन नाही.अनेक सरकारे आली गेली पण संवैधानिक पातळीवर हा प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक आणि शुद्ध मानसिकता कुणाचीही नव्हती हे आता समाजाला पूर्णपणे समजले आहे.सध्या सत्तेत असलेले सरकार देखील याच मानसिकतेचे आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज देखील आता राहिलेली नाही.
कधी आर्थिक निकष,कधी स्वतंत्र आरक्षण,कधी समान नागरी कायदा,तर कधी अपुरे अज्ञान आणि अपुऱ्या सामाजिक अभ्यासामुळे “आम्हाला मिळणार नसेल तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा” अश्या वळणांनी आजपर्यंतचा हा प्रवास इथपर्यंत येवून ठेपला आहे.

महाराष्ट्रात कोपर्डी प्रकरण घडण्यापूर्वी काही ठराविक सामाजिक संघटना आणि विचारवंत अभ्यासकांनी हा मुद्दा अनेक वर्ष लावून धरलेला होता.यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ,मराठा महासंघ,छावा संघटना,संभाजी ब्रिगेड यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्व संघटनांमध्ये आरक्षण कसे मिळेल यावर मतभेद त्यावेळी होते पण एकमेकांच्या विषयी मनभेद नव्हते हे विशेष रूपाने आजच्या अती भावनिक झालेल्या आणि आम्हीच द ग्रेट मराठे,कट्टर मराठे किंवा आम्हालाच काय तो पुळका-कळवळा असा ग्रह करणाऱ्या मराठा समाजाच्या नव आंदोलकांनी प्रतिक्रिया देताना किंवा टीका करताना लक्षात घेतले पाहिजे.गेली अनेक वर्ष या मुद्द्यांवर अभ्यास करणाऱ्या सर्वांचे आता कुठेतरी मागील काही वर्षांपासून एकमत व्हायला लागले की मराठा आरक्षण न्यायालयात आणि कायदेशीर प्रक्रियेत टिकवायचे असेल तर ओबीसी प्रवर्गात आरक्षण मागितले पाहिजे.मराठ्यांचे ओबिसिकरण यावर चर्चा,मेळावे आणि कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित व्हायला लागले.यासाठी जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय हा मुद्दा निकालात निघणार नाही हे लक्षात आले.आताचा तरुण किमान सर्व अंगांनी अंशी हा प्रश्न समजून घ्यायला लागला.

 

या दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारे कोपर्डी प्रकरण घडले आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी मुक मोर्चे काढण्यात आले.अभूतपूर्व गर्दी जमली.समाज अगदी मनापासून एकत्र आला.लाखोंच्या संख्येने सहभागी झाला.या सर्व धामधुमीत मराठा समन्वयक नावाने ओळखले जाणारे तरुण देखील दिसायला लागले.समाज भावनिक होता,प्रचंड संतापलेल्या अवस्थेत होता त्यामुळे जे घडतेय त्यात आपण सामील होणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने तो तन मन धनाने एकत्र येत होता पण यात जसे प्राणपणाने झोकून देवून काम करणारे निष्ठावान होते तसेच काही भामटे पण होते.हीच संधी काही बेरकी समन्वयक आणि सत्तेतल्या लोकांनी ओळखली.नंतर मुक मोर्चाचे रूपांतर अचानक फेसबुकवरून प्रकाशझोतात आलेल्या भोसले घराण्याशी नाते सांगणाऱ्या अर्जुन नावाच्या एका तरुणाने ठोक मोर्चात करायला सुरुवात केली.अनेक तरुण या जाळ्यात अडकले.त्यात राणे सुपुत्र देखील सामील झाले.साहजिकच पेटलेल्या वातावरणात यांनी तेल ओतून आग लावण्याचे काम अगदी नियोजित आणि पद्धतशीरपणे केले.समाज ठरलेल्या आणि योग्य दिशेने जात असताना अचानक दोन विचारात विभागला गेला.अचानक प्रकट झालेला हा अर्जुन भोसले कुठे गेला हा संशोधनाचा विषय आहे आणि आज राणे सुपुत्र कुठल्या वाटेला आहेत हे अवघा महाराष्ट्र पाहतोय.त्यांची तेव्हाची आणि आताची विधाने तपासली तर हे किती निर्लज्ज आहेत हे समजून घेणे सोपे होईल.

Maratha Reservation

या सर्वात मराठा क्रांती मोर्चात असलेले ठराविक समन्वयक सत्तेतील लोकांच्या बऱ्याच अर्थांनी जवळ गेले.मराठा क्रांती मोर्चापर्यंत साधारण असलेले काही लोक अचानक मोठमोठ्या गाड्यांमध्ये दिसायला लागले.सतत मंत्रालयाच्या परिसरात फिरायला लागले.मुंबई सारख्या शहरात पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहायला लागले.कालांतराने मराठा आरक्षणाची दिशाभुल करणाऱ्या सत्तेतील नेत्यांसोबत फोटोत चमकायला लागले.यांची आर्थिक परिस्थिती त्यानंतर अचानक बदलली,बहरली आणि स्थिरस्थावर देखील झाली हे समाजाने समजून घेतले पाहिजे.
क्रांती मोर्चे संपले.सामील झालेले लोक पुन्हा आपापल्या घरी गेले.आपल्या आपल्या काम धंद्याला लागले आणि काही संधीसाधू नेत्यांनी समाजाचा धंदा करून मूळ विषयांना बाजारात बेभाव विकून टाकले.
महाराष्ट्राला जशी पराक्रमांची आणि वीरांची परंपरा आहे,इतिहास आहे तसाच फितुरांचा आणि गद्दारांचा देखील आहे हे या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते.फक्त आपण यातून शिकत नाहीत हीच मोठी शोकांतिका गतकाळात आणि वर्तमानात देखील आहे.

मनोज जरांगे पाटील

मागील काही काळात थोडीफार शांत झालेली आरक्षणाची चळवळ एकदा पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने जागृत झाली.छत्रपती संभाजीनगर मधल्या अंतरवाली सराटी या छोट्याश्या गावात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी बेदम लाठीचार्ज केला.अनेक लोक जखमी झाले.अनेक महिला रक्तबंबाळ झाल्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र आला. मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने पुन्हा एकदा आरक्षण चळवळीने जोर धरला.नंतरच्या सर्व घटना,आंदोलने आणि यात सुरू असलेले वाद हे सर्वश्रुत आहेत.

मागची सर्व पार्श्वभूमी सविस्तर लिहिण्याचे कारण आता राजकारण आहे.

क्रमशः.

 

भाग दोनही अवश्य वाचा

भाग दोन वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

हे पण अवश्य पहा

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Exit mobile version