Maratha Reservation
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ?
मराठ्यांचे पानिपत होईल का ?
(मराठा समाज,वाटचाल जबाबदारी आव्हाने ते आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय या सर्व घडामोडींचा आढावा घेणारी लेखमाला.)
भाग – 2 – मराठा अरक्षणाच्या लढाईत आपले आणि फितूर ओळखायचे कसे ?
प्रत्येक तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी आणि त्यांच्या सोबतच्या ठराविक कार्यकर्त्यांनी अंतरवाली सराटी गाठून आपल्या मुलाखती आणि कार्य अहवाल सादर केलाय अश्या बातम्या सोशल मीडियावर मराठा समाज आता पाहत आहे.यातून काय साध्य होईल किंवा याचे भविष्यातील परिणाम काय असतील याचे उत्तर येणारा ताण काळ देईलच पण हे सर्व घडत असताना समाज म्हणून काही धोके आता दिसत आहेत आणि या प्रचंड भावनिक वातावरणात सर्व घडामोडी घडत असताना याबद्दल चर्चा होणे. यावर समाजाचे लक्ष केंद्रित करणे ही समाजात सक्रिय असलेल्या,जागृत आणि विचारी असलेल्या सामान्य लोकांनी करणे अती गरजेचे,महत्वाचे झाले आहे.सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या विधानसभा निवडणुकीत जर मराठा समाजाच्या वतीने सत्ताधारी आमदार किंवा इच्छुक आमदार यांनी मत विभाजनासाठी प्रोजेक्ट केलेले उमेदवार घुसवले तर “तुला न मला घाल कुत्र्याला” अशी गत समाजाची होईल.संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांचे इच्छुक उमेदवार आता मुलाखती देतील.विशेषत्वाने पाटलांच्या जवळ असलेल्या लोकांशी जवळीक साधतील.या सर्व गर्दीत प्रत्येक उमेदवाराची शहनिशा जरांगे पाटील करू शकणार नाहीत कारण त्यांना मर्यादा आहेत.मात्र पाटलांचे नेतृत्व मान्य असणारे सर्वसाधारण मराठे आणि जागृत मराठे मात्र आपापल्या परिसरात हे काम नक्की करू शकतील.यामुळे जरांगे पाटलांचे आणि पर्यायाने समाजाने स्वप्न भंग होणार नाही.ही चिकित्सा करणे आणि अशी माणसे ओळखण्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी तळागाळातील सामान्य मराठ्यांची असणार आहे.इच्छुक उमेदवार किती काळापासून आंदोलनात सक्रिय आहे.किती वैचारिक भूमिका तो मांडत आलाय आणि नेमके त्या उमेदवाराला सामाजिक,सांस्कृतिकदृष्ट्या समाजाची केली जाणारी फसवणूक कळते का ? हे पाहणे-तपासणे देखील गरजेचे असणार आहे.उमेदवार हा भांडवलदार,ठेकेदार आहे का? हे देखील तपासावे लागेल.ठेकेदार असेल तर आतापर्यंत सत्तेतल्या आमदारांकडून किती लाखांची कोटींची काम मिळवलेले आहेत यावरून स्थानिकांना हितसंबंध लक्षात येतील. आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या आमदारांना मराठा आरक्षण या विषयावरून या इच्छुक उमेदवारांनी किती वेळेला प्रखरपणे जाब विचारला आहे ? किंवा इच्छुक उमेदवारांनी सत्तेतल्या आमदाराच्या विकास कामांचा दर्जा आणि कार्यपद्धतीवर किती वेळेला प्रश्न उभे केलेले आहेत,सत्ताधाऱ्यांचे आणि यांचे संबंध किती सलोख्याचे आहेत ? हे देखील पाहणे यावेळी गरजेचे असणार आहे.
आपल्या आपल्या तालुक्यात,विधानसभा क्षेत्रात आता याचे परीक्षण करणे,अशी माणसे ओळखणे हे समाज म्हणून प्रत्येक मराठ्याची जबाबदारी असेल.सोबतच लायक असणारी,प्रामाणिक असणारी आणि समाजाप्रती ठाम भूमिका सातत्याने घेणारी माणसे शोधून त्यांना विधासभेत पाठवणे हे आपले समाज म्हणून कर्तव्य असणार आहे.अन्यथा या विधानसभा निवडणुकीनंतर जे परिणाम होतील त्याचे चटके मराठा म्हणून दीर्घकाळ समाजालाच भोगावे लागणार आहेत.
तुकोबांच्या चिकित्सक दृष्टीने,शिवबांच्या प्रगल्भ विचाराने आणि छ्त्रपती शाहूंच्या समतेच्या शिकवणीतून जर आम्ही हे सर्व पाहू शकलो तर नक्कीच सर्व काही अगदी स्वच्छ,स्पष्ट आणि सत्य दिसेल यात शंका नाही.
आणि याहून महत्वाचे म्हणजे या महाराष्ट्रातली सामाजिक विण आपल्याला अधिक घट्ट करायची आहे.यासाठी आपल्या हक्काचे मागत असताना ज्यामुळे सर्व विषय निकालात निघतील तेच मुद्दे आपल्याला लावून धरावे लागतील.
Maratha Reservation
मराठा आरक्षण
पहिला भाग अवश्य वाचा
पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण अवश्य पहा
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा