गणपतीची सत्यकथा
पुराणिकांनी जेव्हा या गजाननाची उपासना करणाऱ्या लोकांना हत्तीचे शिर आणि मानवाचे शरीर असलेल्या दैवताच्या मूर्ती पूजताना पाहिले,तेव्हा त्यांच्याही मनात या दैवताच्याविषयी कुतूहल निर्माण झाले असणार. या कुतूहलातून त्यांनी गजाननाच्या निर्मितीच्या कथा रचल्यात. अर्थात, ही त्यांची मनोनिर्मिती होती. त्यांच्या मनोनिर्मितीचे फलित म्हणजे आज प्रचलित असलेल्या गणपतीच्या कथा होत. या कथांनाच गणपतीचा इतिहास म्हणून स्थान मिळाले. प्रसार माध्यमांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांना माहिती पुरविण्याच्या गरजेपोटी या कथांना पुनःपुन्हा पसरविणे चालूच ठेवले. एका परीने प्राचीन व मध्ययुगीन पुराणिकांनी केलेल्या मनोनिर्मितीचे वाहक म्हणून प्रसारमाध्यमे आज कार्य करीत आहेत. ते गजाननाच्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत, कारण की त्यांना ते परवडणारे नाही. त्यांचा ग्राहक वर्ग त्यामुळे त्यांच्यापासून दुरावला जाण्याची भिती त्यांना वाटत असावी. व्यापारी मनोवृत्तीची प्रसारमाध्यमे आणि पोटार्थी पुरोहितांची पिलावळ, यांच्याकडून गजाननाचे मूळ शोधण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण की त्यांच्या चरितार्थाशी हा विषय निगडीत आहे. ज्यांना सत्यशोधनाची चाड आहे तेच हे कार्य करू शकतात. त्याच प्रमाणे जे या विषयाशी भावनिक किंवा आर्थिक दृष्ट्या जुळलेले नाहीत तेच या कार्यात रममाण होऊ शकतात. त्यामुळेच या मागील कारणे शोधण्याचा प्रयत्न पहिल्यांदा भारताबाहेरील विद्वानांनी केला. त्यामागे भारतातील गूढ प्राचीन परंपरांचा शोध घेणे हा एक उद्देश होता. या परंपरा प्रामुख्याने भारतात आणि भारतीय उपखंडातील देशांमध्ये जिवंत आहेत, या वास्तवाची जाणीव त्यांना होती. त्यामुळे भारतीय आणि भारताबाहेरील संस्कृतीमधील प्राचीन ग्रंथ आणि पुरातत्वीय पुरावे यांचा मेळ घालून त्यांनी गजाननाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला.
आपण भारतीय व पाश्चात्य अशा दोन्ही परंपरांमधील विद्वान संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा परामर्श घेत गणपतीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करूया. हे करताना भाषाविज्ञान,इतिहास,पुरातत्त्व,समाजविज्ञान,मानवशास्त्र,धर्मशास्त्र,तत्त्वज्ञान इ. विद्याशाखांचा आधार घेत पुढे जाणार आहोत. यामागे सत्यशोधन एवढाच हेतू आहे. कुणाच्या भावना दुखविण्यासाठी किंवा सुखविण्यासाठी हे आपणास करावयाचे नाही. ही एक शोधयात्रा आहे. तीमध्ये विवेकनिष्ठा असणारांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. श्रद्धाळू गणेशभक्तांनी आपल्या श्रद्धास्थानाचा परिचय करवून घेण्याकरिता यात सहभागी व्हायला हरकत नाही. गणपतीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्या रूढ धारणांना धक्के बसू शकतात व लेखकाविषयी गैरसमजही निर्माण होऊ शकतो. आपले गैरसमज अथवा समज दूर करण्यासाठी आपण लेखकाशी सहजपणे संवाद साधू शकता. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात,असा लेखकाचा विश्वास आहे.
भाषा हे एक जिवंत प्रसारमाध्यम व संवादाचे साधन आज आपणाजवळ उपलब्ध आहे. म्हणून ‘गणपती’ या शब्दाचा शोध घेण्याकरिता प्रथम आपण भाषाविज्ञान व व्याकरणाच्या माध्यमातून पुढे जाऊया. ‘गणपती’ या शब्दामधील ‘गण’म्हणजे काय,हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ.
१-गण,गोत्र व गणचिन्ह ( गणपती ची सत्यकथा )
‘गण’ या शब्दाचे अनेक अर्थ असून भाषाविज्ञान व व्याकरणाच्या माध्यमातून ते स्पष्ट होतात. संगीतामध्येही गण ही संकल्पना असून वैदिक वाङ्मयामध्ये तिचे संदर्भ आढळतात. त्यातून गण शब्द कसा निष्पन्न झाला याविषयीची माहिती आपणास याठिकाणी मिळते. लोककलेमध्ये गण हा एक गानप्रकार असून त्याचा गणपतीशी संबंध आहे. फलज्योतिषामध्ये गण ही संज्ञा मानवी प्रवृत्तीशी संबंधित असून देवगण,मनुष्यगण व राक्षसगण असे तीन प्रकार त्यात सांगितलेले आहेत. असे प्रकार करण्यातून या तथाकथित शास्त्राच्या निर्मात्यांचा पक्षपाती दृष्टिकोन स्पष्ट होतो.
याठिकाणी ‘लोकांचा समूह’ या अर्थाने गण ही संकल्पना अभिप्रेत आहे. शेती करणाऱ्या मानवी समूहाचे एकक म्हणून ‘कुळ’ ही संज्ञा निर्माण झाली. अशा अनेक कुळांच्या समूहाला ‘गण’ असे म्हणतात. एका कुळापासून दुसऱ्या कुळाची ओळख होण्याकरिता कुलचिन्हे उदयाला आलीत. कुलचिन्ह उपासनेमधून कुलचिन्हवादाची संकल्पना निर्माण झाली. कुलचिन्हवाचक पशु,पक्षी, वनस्पती तसेच वापरातील वस्तू यांच्या उपासनेमधून दैवते निर्माण झालीत. कुलचिन्हवाचक पशु,पक्षी,वनस्पती यांचे विशिष्ट दिवशी सेवन करण्याच्या संकल्पनेतून ‘कुलचिन्ह मेजवानी’ हा विधी निर्माण झाला.
कुल आणि गण या शेतीशी निगडीत मानवी समूहाशी संबंधित संकल्पना आहेत. तर गोत्र ही संकल्पना पशुपालन अवस्थेतील मानवी समूहाशी निगडीत आहेत. या वास्तवाची जाणीव नसल्यामुळे बहुधा एकाच अर्थाने हे शब्द वापरले जातात. ‘गणगोत’ हा शब्द त्याचे एक उदाहरण आहे. गणसंस्था ही ‘आत्यंतिक लोकशाहीवादी’ संस्था असून राज्यसंस्था ही लोकशाहीविरोधी होती. हा फरक लक्षात न आल्यामुळे ‘गणराज्य’ हा शब्द प्रचारात आला. गणराज्यांची कार्यपद्धती लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित होती. आजच्या लोकशाहीच्या संकल्पनेशी ती फारशी जुळणारी नव्हती. परंतु,राजेशाही मात्र पूर्णतः हुकुमशाहीवर आधारित होती. काही गण लोकांनी निवडलेले तर काही राजाच्या अधीन होते. अशा काही गणांचे प्रकार होते. त्यांचे उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतात.
गण म्हणजे काय ? ( गणपतीची सत्यकथा )
गण हा संख्यावाचक शब्द असून पाली आणि संस्कृत भाषेत कळप, दल, समूह, संख्या, जमात, श्रेणी,मालिका किंवा वर्ग याही अर्थाने गण हा शब्द वापरला असल्याचे दिसून येते. गणन म्हणजे मोजणे या अर्थानेही गणक,संगणक इ.शब्द अलीकडे प्रचारात आलेत. याशिवाय गण हा शब्द संगीत,व्याकरण,लोककला,फलज्योतिष,लोकांचा समूह इ.अर्थाने प्रचलित आहे. संगीतामध्ये तो कोणत्या अर्थाने येतो हे आपण आता पाहुया.
संगीतातील गण
हिंदुस्थानी संगीताच्या परंपरेत लघु व दीर्घ कालावधीचे विविध लयबंध एकत्र आणले जातात,त्यांना ‘गण’ असे म्हटले जाते. (vishwakosh.marathi.gov.in/33919 ) गण या शब्दाचा संगीताशी असलेला संबंध वैदिक साहित्यातही प्रतिबिंबित झाला आहे. डॉ.रामशरण शर्मा यांनी बृहस्पतीचा उल्लेख गाणारा किंवा गणांना गाणी शिकविणारा,असा आहे असे म्हटले आहे. गणांत बसलेल्या यजमान लोकांना गाणे म्हणण्यास सांगितले जाई व गाणे म्हणणाऱ्याला यज्ञासाठी सामर्थ्य द्यावे म्हणून इंद्राला आवाहन करण्यात येई. बहुधा गणांच्या गान प्रवृत्तीतूनच ’गणक’ हा गानविद्येत कुशल (‘स्वरमंडल’इत्यादी) या अर्थाचा शब्द व्युत्पन्न झाला असावा,असे ते (शर्मा,२००६:११८) म्हणतात.
व्याकरणातील गण
छंदशास्त्रात तीन अक्षरांच्या समूहाला ‘गण’ असे म्हणतात. लघु-गुरु अशा उच्चारातून त्यांची विभागणी केलेली आढळते. संस्कृत व प्राकृत काव्यातली अनेक वृत्ते निरनिराळ्या गणानुक्रमांवर आधारलेली आहेत (जोशी,२००४:६९७). त्यामधूनच मराठी व्याकरणातील छंदोबद्ध काव्यरचनेत वृत्त नावाचा एक प्रकार आलेला आहे. वृत्तांची लक्षणे ठरविताना त्यातील तीन अक्षरांचा एकेक गट करून तो मांडण्याची पद्धत म्हणजे ‘गण’ होय. उच्चाराच्या कमी-जास्त प्रकाराला ऱ्हस्व-दीर्घ म्हणून ओळखले जाते. या ऱ्हस्व-दीर्घ पद्धतीवर वृत्त हा काव्यप्रकार आधारलेला असून ‘अक्षरगणवृत्त’ नावाने त्याचा एक प्रकार ओळखला जातो. त्याचे भुजंगप्रयात,वसंततिलका,शार्दूलविक्रीडित,मंदाक्रांता,मालिनी, मंदारमाला आणि पृथ्वी हे सात प्रकार आहेत.
लोककलेमधील गण
फलज्योतिषातील गण
फलज्योतिष्यामधील देवगण,मनुष्यगण व राक्षसगण या संज्ञा व्यक्तीच्या स्वभावाविषयी अनुमान लावण्याच्या दृष्टीने वापरण्यात आल्या आहेत,हे स्पष्ट आहे. परंतु,त्यांच्यामुळे देवगण आणि राक्षसगण यांच्याविषयी परस्परविरोधी समजुती दृढ करण्याचे कार्य झालेले आहे. याविषयी ना.गो.चापेकर (जोशी २००४:७११) म्हणतात :
“ देव,मनुष्य व राक्षस असे तीन समाज प्राचीन काळी अस्तित्वात होते. हे तीन निरनिराळे मानववंश असावे. असुर आणि राक्षस एक नव्हते. असुर हे देवांप्रमाणेच यज्ञ करणारे होते; पण राक्षस यज्ञ करणारे नसावे. देवासुरांचा लढा यज्ञसंबंधात चाले ; पण देव-राक्षस यांचे वैमनस्य मात्र उपास्य देवतेवरून पडले होते. राक्षसांचा उपास्य देव महादेव किंवा शंकर होता.”
असुर,राक्षस आणि देवांविषयीची विस्तृत माहिती पुढील प्रकरणात आपण पाहणार आहोत. म्हणून याठिकाणी त्यावर भाष्य करणे सयुक्तिक होणार नाही.
लोकांचा समूह म्हणजे गण
गण म्हणजे लोकांचा समूह. ज्या समूहामध्ये आपला नेता सर्वांच्या मताने निवडला जाई,त्या समूहाला गण या शब्दाने संबोधले जात असे. ऋग्वेदामध्ये गण हा शब्द व्रात या शब्दाला धरून येतो,अशी माहिती देऊन पं.महादेवशास्त्री जोशी म्हणतात:
“बौद्ध साहित्यात गण हा शब्द लोकशाही संस्था या अर्थाने वापरला आहे.(महावग्ग २.१८). जातकांत आलेली गणविषयक माहिती अधिक बोधप्रद व सुस्पष्ट आहे. गण ही एक लोकसंस्था होती व ती स्वयंबद्ध होती,असे जातकावरून कळते.” (जोशी,२००४:६९६ )
प्राचीन भारतात लोकशाही व्यवस्था ज्या समाजात अस्तित्वात होती,अशा गणसमाजात गणसभेसाठी जमलेल्या सदस्यांची संख्या मोजण्याकरिता गण हा शब्द वापरला गेला असावा असे काही संशोधकांचे मत आहे. डॉ.रामशरण शर्मा यांनी या शब्दाविषयी ऐतिहासिक माहिती देताना पुढील विधान केले आहे. ते (शर्मा २००६:११२) म्हणतात:
“ प्रजासत्ताकासाठी वापरला गेलेला गण हा पारिभाषिक शब्द ऋग्वेदात शेहेचाळीस वेळा व अथर्ववेदात तो नऊ ठिकाणी आलेला आहे आणि ब्राह्मणांत तो अनेक वेळा आलेला दिसतो. बहुतेक सर्व ठिकाणी सभा किंवा “सैन्याची तुकडी” या अर्थी तो घेतलेला आहे……एका वंशजापासून पितृसत्ताक पद्धतीने चालत आलेल्या कुटुंबाच्या टोळीला लॅटीन ‘जेन्स’ व ग्रीक ‘जेनॉस’ ही नावे आहेत. परंतु,संस्कृत गण या शब्दाला ती समानार्थी मानणे बरोबर होणार नाही. ’गण’ या शब्दाची व्युत्पत्ती ’गण’ मोजणे या धातुपासून साधता येईल. गण या शब्दाचा टोळी किंवा जनकुले असा अर्थ नसला तरी,एकाच टोळीत किंवा जनकुलातील असण्याची अनिवार्यता नसलेल्या,कृत्रिमतेने एकत्र आलेल्या लोकांचा समुदाय,असा त्याचा अर्थ आहे. वैदिक वाङ्मयात अनेक ठिकाणी हा शब्द जनकुलसंख्या या अर्थाने वापरला आहे.”
आर्यांच्या यज्ञसंस्थेचे विवरण करणाऱ्या ‘ब्राह्मण’ ग्रंथांमध्ये ‘गण’ हा शब्द अनेक वेळा आलेला आहे. आठ वसू,अकरा रुद्र,बारा आदित्य यांचाही ‘गण’ म्हणून उल्लेख या ग्रंथांमध्ये येतो. जैन व बौद्ध ग्रंथांमध्येही गणांविषयी माहिती मिळते. ‘समान गुणांचे अनेक लोक’, असाही अर्थ प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. वाल्मिकी रामायणामध्ये ‘समूह’या अर्थाने ‘गण’ हा शब्द वापरलेला आहे. ’गणवल्लभ’ ही एक संज्ञा रामायणामध्ये आली असून गणांचा प्रमुख असा तिचा अर्थ असावा. पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातही ‘गण’ या शब्दाचा अनेकदा उल्लेख आला आहे. गण या अर्थाने ‘संघ’ हा शब्द याठिकाणी वापरलेला असून पूग,गण व संघ या संस्थांच्या कार्यप्रणालीचा उल्लेख येथे येतो. ‘काशिका’ या ग्रंथामध्ये ‘पूग’ म्हणजे आर्थिक संस्था होय,असे म्हटले आहे. पूग,संघ,गण या व्यापारी किंवा सार्थवाही संघटना होत्या,असे डॉ.अशोक व्हटकर यांनी म्हटले आहे. त्यांचा लोकतांत्रिक शासनाशी संबंध येत असे,असे ते म्हणतात.(व्हटकर १९९५ : २२-२३).
सार्थवाह या संघटनेविषयी ‘मोतीचंद्र’ यांनी आपल्या ‘सार्थवाह’या शोधग्रंथामध्ये विस्तृत विवेचन केले आहे. जैन साहित्यातील प्रवासी व सार्थवाह याविषयी माहिती देताना त्यांनी सार्थांच्या पाच प्रकारच्या तांड्यांची माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सोयीकडे सार्थवाह लक्ष पुरवीत असत,असे त्यांनी म्हटले आहे (मोतीचंद्र,२०१८:२०७).
महाभारतात ‘ गण’ हा शब्द ‘गणराज्य’ या अर्थाने आलेला आहे. महाभारतातील शान्तिपर्वाच्या १०७ व्या अध्यायात ’गणां’ची आंतरिक आणि बाह्य नीती,उदय व विनाशांचे कारण,गणांची न्यायव्यवस्था यांचे विवरण आहे. यावरून ती गणराज्ये होती,असे डॉ.व्हटकर म्हणतात. अमरकोशामध्ये राजांच्या गणाला-समूहाला ’राजक’व क्षत्रियांच्या गणाला ‘राजन्यक’ या शब्दाने संबोधले आहे.
जातककथा या बौद्ध ग्रंथांमध्ये ‘गणराज्य’ या अर्थाने गण हा शब्द बरेचदा येतो. एक धार्मिक परिभाषा म्हणूनही या शब्दाचा वापर बौद्ध ग्रंथांमध्ये आलेला आहे. ‘गणबंधन’ या धार्मिक समूहाला ‘वर्ग’ या शब्दानेही तेथे संबोधलेले आढळते. चतुर्वर्ग भिख्खुसंघ,पंचवर्ग भिख्खुसंघ,दशवर्ग भिख्खुसंघ इ.शब्दांनी या धार्मिक गणांचा उल्लेख बौद्ध ग्रंथांमध्ये येतो. लोकतांत्रिक शासन या अर्थाच्या गण या शब्दापासून व्युत्पन्न झालेले ‘गणपूरक’, ‘गणबंधन’,’गणमग्ग’ हे शब्द बौद्ध ग्रंथांमध्ये येत असले तरी त्यांचे स्वतंत्र अर्थ आहेत.
जैन साहित्यात ‘गण’ ही एक शासनपद्धती होती,याचे वारंवार उल्लेख येतात. ‘गणराजानो’ या शब्दाने तेथे ‘सामंत’ या संस्थेला संबोधले आहे. महाभारत,जैन व बौद्ध साहित्य निर्मितीच्या काळात गणराज्यांचे रुपांतर ‘सामंतशासना’त झाल्याचे यावरून दिसून येते.
वराहमिहिराने आपल्या ‘बृहत्संहिता’(१५-१५) या ग्रंथात’गणनायक’हा शब्द वापरलेला आहे. तसाच तो जैनांच्या कल्पसुत्रामध्येही(२-६१)येतो. सेनादलाचा नेता असा त्याचा अर्थ याठिकाणी अभिप्रेत आहे. ‘अभिधानराजेन्द्र’ या जैन कोशात ‘गण’या शब्दाची व्याख्या करताना ‘अचितगण’ आणि ‘सचितगण’ असे दोन प्रकारचे गण असल्याचे नोंदविलेले आहे. साधारण लोकांच्या समूहाला ‘अचितगण’ तर विवेकी लोकांच्या समूहाला ‘सचितगण’ या शब्दांनी येथे संबोधलेले आहे. जैनांच्या आचारंगसूत्रात ‘गणरायाणि’ हा शब्द लोकशासनाला उद्देशून वापरला आहे.
काही विद्वानांनी ‘गण’ व ‘संघ’ हे एकच अर्थाचे शब्द असल्याचे मानलेले आहे. डॉ.फ्लीट यांच्या मते ‘गण’ म्हणजे भटकी टोळी किंवा टोळ्या होत (Hindu polity,1924 :24). काशीप्रसाद जयस्वाल मात्र ‘गणराज्य’ म्हणून गणांना संबोधतात. डॉ.डी.आर. भांडारकरांच्या मते गण किंवा संघ म्हणजे निश्चित उद्दिष्टासाठी कामे करणारा समूह होय. डॉ.आर.सी.मुजुमदार यांनी नियमधर्म पाळून सर्व कार्य करणारा समूह म्हणजे संघ किंवा गण होय,असे म्हटले आहे (Majumdar, 1922:221). डॉ.यू.एन.घोषाल यांनी या दोन शब्दांचे दोन वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. त्यांच्या मते,गणसंघात म्हणजे प्राण्यांचा समुदाय होय,तर गण-संघ ही एक विशेष राजकीय परिभाषा असून धार्मिक व आर्थिक बाबतीतही हे शब्द वापरले जात असत.
संघ या शब्दाविषयी मात्र विद्वानांमध्ये मतभेद आहेत. तीन वेगवेगळ्या अर्थाने हा शब्द प्राचीन काळी वापरण्यात आला आहे. त्यापैकी एक अर्थ सामान्य समूह असा असून त्यात नट,गायक,नर्तक इत्यादींचा समावेश होतो. वाल्मिकी रामायणात या अर्थाने हा शब्द वापण्यात आला आहे(अयोध्याकांड-६-१४). दुसरा अर्थ अराजकीय अशा बौद्ध संघासाठी वापरण्यात आला आहे. तिसरा अर्थ राजकीय असून अनेक गणराज्ये एकत्र येऊन बनलेला संघ असा आहे.’ अंधक-वृष्णीसंघ’ हे त्याचे एक उदाहरण होय.
कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात १- आर्थिक व्यापारी संघ,२-संघ राज्य या अर्थाने संघ हा शब्द योजिला आहे. या ग्रंथात ‘वार्ता शस्त्रोपजीवी ‘असा केलेला उल्लेख व्यापारी-सार्थवाहांसाठी केला असल्याचे डॉ.व्हटकर म्हणतात. ‘शस्त्रोपजीवी’ या शब्दाने ज्या संघाचा उल्लेख याठिकाणी आला आहे,तो राज्य शासनाशी संबंधित आहे, असे त्यांचे मत आहे (व्हटकर१९९५ :२६).
टीप- या लेखाचे संपूर्ण संदर्भ दुसऱ्या भागाच्या शेवटी देण्यात आले आहेत.
दूसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 2 कुल व गण परस्परसंबंध
लेखक- प्रा. डॉ. अशोक राणा
हे मुर्तीशास्त्राचे अभ्यासक आहेत. भारतीय मिथक शास्त्रावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.
हे पण वाचा
बैलपोळा भारतीय कृषी संस्कृतीतील अब्राह्मणी सण. बैलपोळा 2024
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 1
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 2
Malegaon protest – मालेगाव निषेध आंदोलन, 1
आमचे विडियो पाहण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा
YouTube – kanokan News
Instagram- kanokan News
Facebook- kanokan Topics