कुल व गण परस्परसंबंध
‘कुल’ या संज्ञेमधूनच ‘गण’ या संस्थेचा विकास झाला आहे,असे प्राचीन विद्वान सांगतात. वासुदेव शरण अग्रवाल यांनी गण किंवा संघ या दोन्ही संस्थांचा आधार कुल असून प्रत्येक कुल हे स्वतंत्र एकक मानले जात असे. एका कुलाचा एक प्रतिनिधी शासनव्यवस्थेत भाग घेण्यास अधिकारी मानला जात असे व त्याला राजा म्हटले जात असे,हे महाभारताच्या सभापार्वाच्या आधारे म्हटले आहे. पाणिनीच्या काळात राज्य आणि गण अशा दोन्ही शासनपद्धती अस्तित्वात होत्या असेही त्यांनी (अग्रवाल १९६९:४२८) म्हटले आहे. पाणिनीचा काळ इ.स.पू.पाचवे ते चवथे शतक असल्याचे संशोधकांनी नोंदविले आहे. यावरून आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी गणसंस्था अस्तित्वात होती,हे सिद्ध होते.
डॉ.रा.शा.मोरवंचीकर याविषयी अधिक माहिती देताना म्हणतात :
कात्यायनाने गणाची व्याख्या कुलसमूह अशी केली आहे. त्यावरून सत्ता कुलावर आधारलेली असावी असे दिसते. पण वृष्णी गणराज्यात कुलप्रमुखाशिवाय भाऊ,मुले सर्वच सभेत हजर राहत. शाक्य गणराज्यात वयोवृद्ध व तरुण सर्व सभासद असत. मात्र सर्व वर्णांच्या लोकांना राज्याधिकार होता असे दिसत नाही. प्रामुख्याने सत्ता क्षत्रियांकडेच असे. डॉ.अ.स.आळतेकरांच्या मते, सार्वभौम सत्ता ही फक्त राज्यसंस्थापक कुलातच असावी. त्यांना राजन्य ही उपाधी लावण्यात येई. इतर क्षत्रियांना राजन हे नामाभिधान लावण्यात येई. उदाहरणार्थ शाक्य गणराज्यात या सत्ताधारी कुळातील लोक राजधानीत राहत व स्वतःस राजा म्हणवीत. अंधक-वृष्णी गणराज्यात श्वाफलक,चैत्रक,वासुदेव आणि शिबी यांचे वंशजच राजन्यक होते. यांसारख्या मोठ्या गणराज्यात सत्ता मोठ्या मध्यवर्ती सभेकडे असे. यौधेय गणराज्यात ५००० तर लिच्छवी गणराज्यात ७,७०० सभासद होते. या कुलांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्याने प्रतिनिधी निवडण्याचा प्रश्नच नव्हता. काही गणराज्यात मात्र सर्वच क्षत्रिय राजकीय अधिकारात सहभागी होते त्यांना ‘राजकगण’ असे संबोधले जाई. इतर काही गणराज्यात क्षत्रिय व वैश्यवर्णीय सत्तास्थानी होती, असा अर्थशास्त्रात उल्लेख आहे (मराठी विश्वकोश : ४ : ८०७).
कुल म्हणजे काय ?
पं.महादेवशास्त्री जोशी ‘कुल’ या शब्दाचे मूळ सांगताना म्हणतात :
” एका नांगराला सहा बैल जोडल्यावर अशा नांगराच्या साहाय्याने एका दिवसात जितकी भूमी नागरली जाईल तितक्या भूमीला कुल असे म्हणत. दहा ग्रामांवरच्या अधिकाऱ्याला निर्वाहस्थान म्हणून एक कुल एवढी भूमी देत असत (मनु. ७.११९) यावरून कुल म्हणजे एका कुटुंबाच्या निर्वाहाला पुरेशी भूमी,असा अर्थ निष्पन्न झाला. अशा कुलावर उपजिविका करणाऱ्या संबंधी माणसांना कुल अशी संज्ञा पुढे लक्षणेने प्राप्त झाली असावी (जोशी,२००४:४३४).
‘ कु ’या एकाक्षरी शब्दाचा अर्थ जमीन असा होतो. जमीन कसणाऱ्यांना कुळ व कुळांच्या समूहाला कुळवाडी असे म्हणतात. त्यापासूनच कुणबी हा शब्द तयार झाला व त्याचा अर्थ शेती करणारा असा होतो. कॉ.शरद पाटील कुल या शब्दाविषयी माहिती देताना म्हणतात :
“ …कुलजमिनीचा अर्थ (एकत्र) कुटुंबाला पुरेल एवढी जमीन असा लावतात. हा अर्थ जरी आपण मान्य केला, तरी दहा गावांवरचा अधिेकारी चौदा एकराइतक्या तुटपुंज्या जमिनीवर संतुष्ट राहील असे समजणे हास्यास्पद आहे. दहा गावांचा अधिपती मध्ययुगीन महाराष्ट्राच्या देसाई वा देशमुखाच्या दर्जाचा होता. त्याचे कुळ ज्या गावांचे वतनदार असे, त्या गावचा पाटील म्हणून तो वतनी इनाम नावाची जमीन उपभोगीत असे. ही जमीन क्षेत्राने एक चाहूर असे. जदुनाथ सरकार सांगतात की, एक चाहुर म्हणजे २० बिघे, म्हणून एक कुल जमीन म्हणजे १२० ते १६० बिघे क्षेत्र हाच कुलाचा अर्थ असू शकतो. शेतीचा मायाविधी असलेल्या तंत्रात ‘कुल’ चा अर्थ ‘स्त्री’ असा होतो (पाटील १९८२:४६) .”
या विवेचनामधून कुल हा शब्द शेतीशी संबंधित आहे,हे स्पष्ट होते.
कुल म्हणजे कुटुंब नव्हे,तर कुल म्हणजे अनेक कुटुंबांचा समूह होय. कुल या संकल्पनेविषयी वैदिक साहित्यातील माहिती देताना डॉ.रामशरण शर्मा म्हणतात (शर्मा २००७:९०) :
“ ऋग्वेदात कुल (Family) ही संज्ञा फार कमी वेळा वापरली गेली. म्हणजे फक्त आई,वडील मुलगे व गुलाम इत्यादी नव्हेत. त्यामध्ये इतर अनेक लोकांचा समावेश होतो. प्राचीन वैदिक अवस्थेत ऋग्वेदात गृह ही अनेकदा वापरलेली संज्ञा कुळाचा निर्देश करीत असावी. प्राचीन इंडो- युरोपियन भाषांमध्ये पुतण्या,नातू,भाचा इत्यादिंसाठी एकच शब्द वापरलेला आहे. कुलाच्या नातेसंबंधातील प्रभेद भिन्न नातेसंबंध स्थापन होण्याइतपत पुढे गेलेला नव्हता. कुल हे एक विशाल एकक (युनिट)समजले जात असे. रोमन समाजाप्रमाणे या कुळातही पिता हाच प्रमुख असल्यामुळे पितृसत्ताक पद्धती होती हे स्पष्ट होते. कुळाच्या अनेक पिढ्या एकत्र एका छपराखाली राहिल्या असाव्यात. पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे कुळात पुत्राचा जन्म पुनःपुन्हा व्हावा अशी अपेक्षा प्रकट केली जात असे. विशेषतः युद्धात लढण्यासाठी शूर पुत्र असावेत अशी ते परमेश्वरापाशी प्रार्थना करीत असत. ऋग्वेदामधील ऋचांमध्ये संततीसाठी आणि गोधनासाठी वारंवार इच्छा प्रकट केली असली तरी कन्या प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त केलेली नाही.”
याठिकाणी डॉ. शर्मा वैदिक समाजामध्ये पुत्राचे महत्त्व होते,तसे कन्येचे महत्त्व नव्हते,हे वास्तव अधोरेखित करतात. अवैदिक समाजामध्ये पुत्राऐवजी कन्येलाचा महत्त्व होते. कारण की,त्यांच्यात मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. वरील अवतरणात लेखकाने कुल हा शब्द कुटुंब या शब्दाचा पर्याय म्हणून वापरला आहे. परंतु,त्यात कितपत तथ्य आहे, हेही पाहिले पाहिजे.
कुल व कुटुंब यांमधील फरक
कुल व कुटुंब हे वरवर सारखे दिसणारे शब्द असले तरी,या दोन शब्दांमध्ये सूक्ष्म असा फरक आहे. त्याचप्रमाणे क्लॅन (Clan) या इंग्रजी शब्दासाठी ‘कुल’ या शब्दाचा होणारा वापरही चुकीचा आहे. समाजशास्त्रातील परिभाषेनुसार मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. आपल्या सुरक्षिततेच्या तसेच विकासाच्या गरजेपोटी तो समूह करून राहतो. या समूहामध्ये परस्परांपासून भिन्न असे काही गट असतात. त्यांना आपण कुटुंब असे म्हणतो. कुटुंब हे आप्तसंबंधावर आधारलेले असतात. रक्तसंबंध व आप्तसंबंध (Kinship) हे मनुष्याच्या जैविक,सामाजिक, आर्थिक,धार्मिक,सांस्कृतिक व राजकीय गरजांची पूर्ती करतात. या आप्तसंबंधावर ‘कुल’ ही संकल्पना वा व्यवस्था आधारलेली असते. याविषयी गुरुनाथ नाडगोंडे म्हणतात :
“ मानवशास्त्रज्ञांनी कुल या संकल्पनेसाठी (Clan) हा शब्द वापरलेला आहे. परंतु त्यातून मातृसत्ताक व पितृसत्ताक अशा दोन्ही आप्तसंबंधावर आधारित गटांचा समावेश होतो. त्यांची स्वतंत्र ओळख पटावी यासाठी गोल्डनवायसर या मानवशास्त्रज्ञाने वेगवेगळे शब्द वापरले आहेत. मातृवंशाधिष्ठित नातेवाईकांच्या समूहाला Clan तसेच पितृवंशाधिष्ठित समूहाला Gens असे त्याने संबोधले. रॉबर्ट लुई याने ब्रिटीश मानवशास्त्राप्रमाणे (Clan) हा शब्द कुलासाठी न वापरता पितृवंशक अथवा मातृवंशक आप्तसंबंधियांच्या गटाला (Sib) असे म्हटले आहे. परंतु या दोन गटामधील फरक स्पष्ट होण्याकरिता पितृकुल (Palromoneal Clan) व मातृकुल (Memoneal Clan) असे शब्द वापरले आहेत. हे जरी असले तरी आज या दोन्ही कुलांसाठी (Clan) हा शब्द जगभर वापरला जातो. याठिकाणी Clan चा पर्यायी कुल हा शब्द विशिष्ट प्रकारच्या मानवी टोळीसाठी वापरला गेला हे स्पष्ट आहे (नाडगोंडे,२००३:१४३).”
इंग्रजी भाषेने आपल्या परीने कुल या पारिभाषिक शब्दाचा संभ्रम दूर केलेला आहे. परंतु मराठी व हिन्दी भाषेत बरेचदा कुल,गण,वंश व गोत्र हे एकाच अर्थाने वापरले जातात. यांपैकी कुल या समूहाला आपली ओळख असावी म्हणून जी चिन्हे दिली जात असत,त्यांना कुलचिन्ह असे म्हणतात. ती कशी निर्माण होत,हे या ठिकाणी आपण पाहूया.
कुलचिन्हे कशी निर्माण होतात ?
मानवशास्त्राच्या अभ्यासात मोलाची भर टाकणारे सर जेम्स जॉर्ज फ्रेझर (१८५४-१९४१) यांनी ‘टॉटेमीझम ऍ़न्ड एक्सझॉगॉमी’ या ग्रंथामध्ये (Frazer,2009:13) कुलचिन्हवादाची संकल्पना विस्ताराने मांडलेली आहे. एखाद्या प्राणी,वनस्पती,वस्तू किंवा इतर नैसर्गिक घटकांमध्ये अलौकिक शक्ती असते व ती आपणास अनुकूल करवून घेतल्यास मानवाला अपेक्षित सुख प्राप्त होऊ शकते,या धारणेतून कुलचिन्हवादाची संकल्पना आकाराला आली. त्यामुळे विशिष्ट कुलाचे चिन्ह विशिष्ट पशु-पक्षी वनस्पती,वस्तू किंवा नैसर्गिक घटक ठरविण्यात आलेत. कुलचिन्ह हा शब्दप्रयोग प्रामुख्याने अनेक लोकांच्या सामाजिक समूहासाठी तसेच त्यांच्या धार्मिक विधीतील विशिष्ट घटकासाठी वापरण्यात आला. इंग्रजीत टॉटेम (Totem) या शब्दाने त्याला संबोधले गेले. कुलचिन्हवाचक घटकांची निश्चिती शिकार वा अन्न गोळा करण्याच्या अवस्थेत तत्कालीन मानवाने केली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.
फ्रेझर प्रमाणेच सिग्मंड फ्रॉईडनेही कुलचिन्हवादावर संशोधनपर लेखन केलेले आहे. सिग्मंड फ्रॉईडने आपल्या ‘ टॉटेम अँड टॅब्यू ‘ या ग्रंथात (Freud 1919:30) कुलचिन्हाच्या निर्मितीमागील मानसशास्त्रीय भूमिका मांडलेली आहे. त्याचप्रमाणे कुलचिन्हाविषयीच्या निषेधाच्या परंपरांचीही माहिती दिलेली आहे.
कुलचिन्ह मेजवानी
आदिमानवांच्या कुलचिन्हांकित (Totemistic) समाजात विशिष्ट प्राणी,पक्षी,वृक्ष हे त्यांचे पूर्वज असल्याची भावना होती. फ्रॉईडच्या मते विशिष्ट कुलचिन्ह हे खरोखर त्या समूहाच्या किंवा टोळीच्या आदिपूर्वजाचे म्हणजे ”पित्याचे प्रतीक असले पाहिजे. पित्यासंबंधीच्या भितीतूनच कुलचिन्ह मेजवानी (Totem feast) हा आदिमसमाजातील एक मोठा वार्षिक उत्सव-समारंभ सुरू झाला असावा असा निष्कर्ष फ्रॉईडने काढला. यावेळी वर्षातून एकदा कुलचिन्हप्राण्याला विधीपूर्वक ठार करून त्याचे मांस ‘प्रसाद’ म्हणून भक्षण केले जाते.
या विधीवरून फ्रॉईडने एक सिद्धांत प्रस्थापित केला. त्याच्या मते,आदिमानवांच्या टोळीचा प्रमुख हा एखादा महाबलवान पुरूष असून,त्याचा टोळीतील स्त्रियांवर काही ‘खास हक्क’ असावा. कालांतराने त्याची तरुण मुले त्याची प्रतिस्पर्धी ठरून त्याला ठार करीत असावीत. त्यांना त्याने यापूर्वी ठार करण्याचा प्रयत्न केला असावा व त्यात काहींचे प्राणही गेले असावेत. त्यामुळे पिता-पुत्रामधील वैर विकोपास जाऊन सर्व पुत्रांनी एकत्र येऊन आपल्या पित्यालाच त्यांनी नष्ट केले असावे. त्याच्यानंतर त्याच्या स्त्रिया पुत्रांच्या ताब्यात येत असाव्यात. नंतर त्या स्त्रियांसाठी त्यांची आपापसात युद्धे होत असावीत. शेवटी पित्याच्या स्त्रियांवर कुणीही हक्क सांगायचा नाही या मुद्यावर तडजोड होऊन ते टोळीबाहेरील स्त्रियांचा शोध करू लागत. मानवाच्या धार्मिक विधिनिषेधामागील पार्श्वभूमी ही असावी असा धर्माच्या निर्मितीविषयीचा फ्रॉईडचा सिद्धांत आहे (Freud,1919:171).
फ्रेझर व फ्रॉईडच्या कुलचिन्हविषयक संशोधनांनी मानवशास्त्राच्या पारंपरिक समजुतींना तडा बसला. पाश्चात्य जगतावर जसा फ्रेझर व फ्रॉईड यांच्या वरील संशोधनांनी प्रभाव गाजविला तसा तो पौर्वात्य देशातील अभ्यासकांवरही. कुलचिन्ह,गणचिन्ह यांनाच बरेचदा ‘गोत्र’ या शब्दानेही संबोधले जाते. परंतु,ते चुकीचे आहे. कारण की कुल व गण या शब्दांचा परस्परांशी जसा संबंध आहे,तसा गोत्र या शब्दाचा नाही. तो कसा,ते आता पाहूया.
कुल,गण व गोत्र
‘गणगोत’ हा शब्द नात्यातील लोक या अर्थाने मराठी भाषेत स्थिरावला आहे. गण आणि गोत्र या दोन शब्दांची संधी होऊन हा शब्द सिद्ध झाला आहे. त्याचा विग्रह केल्यानंतर आपल्यापुढे हे वास्तव येते,की या दोन शब्दांना स्वतंत्र अर्थ असून ते वेगवेगळे आहेत. अनेक कुल ज्या समूहामध्ये समाविष्ट असत त्याला ‘गण’ या शब्दाने संबोधले जात असे. गोत्र ही संस्था मात्र यापेक्षा वेगळी आहे.
बरेचदा गोत्र हा शब्द कुल या अर्थानेही वापरला जातो. परंतु,या दोन्ही संज्ञा स्वतंत्र आहेत. कुल हा शेतीशी संबंधित शब्द असल्यामुळे शेतकरी वर्गाशी तो निगडीत आहे. तर जे शेती करीत नाहीत,अशा समाजातील वर्गासाठी ‘गोत्र’ हा शब्द वापरला जातो.
गोत्र या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एका अर्थाने गो म्हणजे इंद्रियांपासून झालेले. तर या शब्दाचा दुसरा अर्थ होतो,गायीचा गोठा. पं.महादेवशात्री जोशी यांनी याविषयी पुढील माहिती दिली आहे. ते (जोशी,२००५:१३०) म्हणतात :
“ ऋग्वेदात गोत्र शब्द अनेकदा आलेला आहे. तिथे या शब्दाचे गाईचा गोठा,गाईचा कळप,मेघ,पर्वतश्रेणी,पर्वत शिखर,किल्ला इ.अनेक अर्थ होतात. काही ठिकाणी गोत्र शब्दाचा समूह असा अर्थ घेतलेला दिसतो. छांदोग्योपनिषदात कुटुंब या अर्थी गोत्र शब्द आलेला आहे (४.४.१). यावरून त्याचा पुढे एकाच वंशातले लोक असा अर्थ केला गेला. गो = भूमी व त्र म्हणजे संरक्षक,त्यावरून भूमिसंरक्षक वर्ग असाही कोणी गोत्र शब्दाचा अर्थ करतात. त्यावरून आपल्या भूमीच्या बाहेरची म्हणजे दुसऱ्या गोत्रातील मुलगी करणे किंवा पळून आणणे,हाच पुरुषार्थ होय ; अशा कल्पनेमुळे गोत्राबाहेर लग्न करण्याची प्रथा रूढ झाली असावी.”
चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांचा समावेश होतो. त्यांच्यामध्ये गोत्र ही संस्था अस्तित्वात आहे. जे ब्राह्मण नाहीत व ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल तर,सरसकटपणे ते ‘कश्यप’ या गोत्राचे आहेत,असे पुरोहित धार्मिक कार्याच्या वेळी सांगतो. विवाहप्रसंगीही हीच गोष्ट अनुभवास येते. याचा अर्थ सर्व लोक ब्राह्मणांपासून झालेले आहेत,असा होतो. ब्राह्मणांचे जसे काही गोत्र आहेत,तसे इतर लोकांचे नाहीत. यावरून गोत्र ही संस्था केवळ ब्राह्मणांचीच आहे,हे स्पष्ट होते. डॉ.जी.एस.घुर्ये यांनी (Ghurye,1962:13) गोत्र ही संस्था केवळ ब्राह्मणांमध्येच प्रचलित होती,हे विस्तृत विवेचनाच्या आधारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतीवर आधारित जीवन जगणाऱ्या समुदायासाठी ती वापरणे चुकीचे आहे. याच कारणाने ‘गणगोत’ हा शब्दही चुकीचाच ठरतो. कारण की, गणांचा आधार कुल असून अनेक कुळांच्या समुदायासाठी गण ही संज्ञा प्रचलित होती,हे आपण यापूर्वी पाहिले आहे.
गणराज्यांची कार्यपद्धती
आता गण ही प्राचीन भारतातील राजकीय संस्था कशी कार्य करीत असे,हे पाहूया.
डॉ.मोरवंचीकर याविषयी आपले माहिती देताना म्हणतात :
“ याशिवाय (गणांमध्ये) राज्यकारभारासाठी कार्यकारी मंडळेही असत. मल्ल गणराज्यात चार जणांचे, लिच्छवीत नऊ जणांचे, तर लिच्छवी-विदेह संघराज्यात अठरा जणांचे अशी कार्यकारी मंडळे होती. अधिकाऱ्यांची नियुक्ती सभेकडून होत असे. क्षुद्रक गणात अलेक्झांडरशी वाटाघाटी करण्याचा अधिकार १५० दूतांना दिला होता. महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा,गुप्तता राखण्यासाठी सभेत न करता त्यासंबंधीचे निर्णय कार्यकारी मंडळांनी घ्यावेत; असा सल्ला महाभारतात दिला आहे.
गणराज्यातील सभेच्या कामकाजाच्या पद्धतीची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध नाही. परंतु गौतम बुद्धाने स्थापलेल्या बौद्धसंघाची कार्यपद्धती त्याकाळच्या गणराज्याच्या सभेच्या कार्यप्रणालीच्या धर्तीवर आधारलेली आहे असे मानण्यास वाव आहे. यावरून सभेची कार्यपद्धती गुंतागुंतीची आणि पुढारलेली होती असे दिसते. सभेसाठी सभासदांची किमान गणसंख्या आवश्यक असे. गणपूरक नावाचा अधिकारी यासाठी नेमला असे. सभेच्या अध्यक्षास संघमुख्य म्हणत. प्रस्ताव कोणत्याही सभासदाकडून मांडण्यात येई व त्यावर चर्चा होई. ठरावावर मतदान घेण्यात येई. मतदान गुप्त पद्धतीने (गुल्हक) अथवा उघडपणे (विवतकम) घेण्यात येई. मतदान पद्धतीत मतपत्रिकांना शलाका ही संज्ञा असे आणि त्या मतपत्रिका शलाका ग्राहक नावाचा अधिकारी गोळा करत असे. उघड मतदानात ठरावाच्या विरोधी असणारेच बोलत. निर्णय बहुमताने घेण्यात येई. राजकीय महत्त्वाचे विषय सभेत चर्चिले जात. उदा.,जेव्हा शाक्यांच्या राजधानीस कोसल राज्याने वेढा घातला,तेव्हा त्या युद्धासंबंधीचा निर्णय गणसभेतच घेतला गेला. शासनातील कार्यकारी अधिकारी, सेनापती सभेतूनच निवडले जात. अधिकाऱ्यांवर सभेचे नियंत्रण असे. महाभारतात श्रीकृष्ण स्वतः सभेचा दास झाल्याची तक्रार करतो. अर्थशास्त्रात द्रव्याचा अपहार करणाऱ्यास अधिकारावरून काढले जावे व शिक्षा करण्यात यावी असे सुचवले आहे.
या सभेच्या सर्व कार्यपद्धती लोकशाही परंपरेस अनुरूप होत्या,असे म्हणता येणार नाही. कोणती मतपद्धत वापरली जावी व सभेचा निर्णय काय झाला,या गोष्टी सभापती ठरवी. सभेने बहुमताने घेतलेला निर्णय जर धर्मविघातक आहे असे त्याला वाटले,तर हे झालेले मतदान बाद करण्याचा अधिकार त्यास असे. तीनदा मतदान घेऊनही जर निर्णय धर्मबाह्य आहे,असे त्यास वाटले तर तो दिवसच अशुभ आहे असे ठरवून दुसऱ्या दिवशी फक्त धर्मात अनुसरून बोलणाऱ्यांचेच मतदान घेण्यात येई. शलाकाग्राहक व सभापतीस दिलेल्या या अधिकारामुळे कधी कधी गुप्त मतदान अर्थशून्य ठरण्याची शक्यता असे.
महाभारतातील शांतिपर्वात गणराज्याच्या शासन पद्धतीचे सविस्तर वर्णन दिले आहे. त्यावरून गणराज्यात पक्ष वा गट होते असे दिसते. द्वंद (दोन पक्ष),व्युत्क्रमण( त्यांची स्पर्धा) तसेच वर्ग्य,गृह्य, वगैरे शब्द त्यांना अनुलक्षून वापरले जात. पक्ष त्यांच्या नेत्यावरून ओळखला जाई. उदा.अक्रूरपक्ष, वासुदेव वर्ग्य इ.गटवादी. वंशकलह व सत्ता स्पर्धेतून निर्माण होणारा संघर्ष यामुळे गणराज्य बलहीन होत. भीष्माने गणराज्यांना बाहेरील आक्रमणापेक्षा अंतर्गत दुहिचा धोका जास्त गंभीर आहे असा इशारा दिला आहे. कौटिल्याने गणराज्यात दुहीची बीजे कशी पेरावीत व त्यांना कसे जिंकावे याबद्दल राजाला सल्ला दिला आहे. दूत व हेराकरवी या भेदनीतीचा वापर कसा करता येईल यासंबंधी त्याने अर्थशास्त्रात चर्चा केली आहे. संघप्रमुखात फूट पाडून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण करून किंवा त्यांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून गणराज्य दुर्बल होते व जिंकता येते. एरवी संघराज्यात लोकांची पिळवणूक होत नसल्यामुळे ती जिंकण्यास अत्यंत कठीण असतात, हे तो मान्य करतो.
गौतम बुद्धाने असे अंतर्गत कलह कसे टाळावेत व गणराज्य समर्थ करण्यासाठी कोणती पथ्ये पाळावीत हे सांगितले आहे. जोपर्यंत वृजी गणराज्यात नेहमी सभा भरवली जाते, सर्वांनुमते निर्णय घेतले जातात, परंपरागत संकेतांचे पालन केले जाते,वयोवृद्ध व परस्त्री यांना आदराने वागविले जाते, मंदिरांचे पावित्र्य राखले जाते; तोपर्यंत गणराज्य जिंकता येणार नाही, असे तो म्हणतो.
नंतरच्या काळात या गुणांचा ऱ्हास झाला असावा व तेथील जीवन असुरक्षित झाले असावे. कारण आचारांगसूत्रात जैन भिक्षूंनी गणराज्यात संचार करू नये, असा आदेश दिलेला आहे. दंभ,अतिऔपचारिकता,रुढीप्रियता इत्यादींची वाढ झाली व त्यातूनच बऱ्याच गणराज्यांचा विनाश झाला. स्वतःच्या वंशाच्या गर्वाने प्रेरित होऊन शाक्यांनी प्रसेनजीत राजाचा पुत्र विद्दुभ यास फसवून एका दासी कन्येशी त्याचा विवाह केला. त्याचा सूड म्हणून त्याने शाक्य गणराज्य धुळीस मिळवले. अजातशत्रूने वैशाली गणराज्य जिंकले. इतर बरीच गणराज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेतली. काही गणराज्यांच्या अधिकाराचा जागा वंशपरंपरागत झाल्यामुळे त्याचेही राजेशाहीत रूपांतर झाले. मध्य काळात इटलीत नगर गणराज्ये अस्तित्वात होती,परंतु ती सर्व नवोदित राजेशाहींना बळी पडली (जोशी,१९७६:८०७).
बुद्धाने निर्माण केलेले संघ ही गणांचीच प्रतिकृती होती. संघात समता आणि समान व्यवहाराची शिकवणूक बुद्धाने दिली होती(आंबेडकर,२००१:४३७). भिख्खुंसाठी संघामध्ये असलेले नियम तिपिटकांचा भाग असलेल्या विनयपीटक (सांकृत्यायन,२०१३:४१) या पाली ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.कालांतराने गणसंस्थेचे विघटन होऊन त्याजागी राज्यसंस्थेचा उदय झाला. या संबंधीचे सूचन बुद्धचरित्रात आपणास दिसून येते.
प्राचीन साहित्यामध्ये गण हा शब्द बरेचदा राज्य या अर्थानेही आढळतो. त्याचप्रमाणे गणराज्य हाही शब्द वापरताना बरेच अभ्यासक आढळतात. याविषयी सखोल संशोधन करणाऱ्या देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी गण व राज्य या दोन वेगवेगळ्या संज्ञा असून त्या एकाच अर्थाने वापरण्याला विरोध केला आहे(चटोपाध्याय,२००५:३८१)
गणराज्यांचे प्रकार
आरतीनंतर बऱ्याच ठिकाणी मंत्रपुष्पांजली म्हणण्याची पद्धत आहे. हाताच्या ओंजळीत फूल अथवा आपल्या आराध्य दैवतास वाहण्याकरिता घेतलेली सामग्री धरून हा मंत्र म्हटला जातो. त्यात “साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी ” असे एक कडवे असते. त्यात ज्या वैराज्य,पारमेष्ठ्य,समंतपर्यायी या राज्यपद्धतीचे वाचक शब्द येतात,ते गणराज्याचे सूचक आहेत. याशिवाय गणांचे आणखी काही प्रकार होते. त्याविषयी माहिती देताना अशोक व्हटकर यांनी म्हटले आहे,की (व्हटकर,१९९५:२०):
“ प्राचीन लोकतांत्रिक राज्यांचे खालील प्रकार उल्लिखित आहेत.
१) वैराज्य : या पद्धतीत प्रत्येक व्यक्तीस मताधिकार असून त्यास राज्यव्यवस्थेत भाग घेता येणे शक्य असे.
२) गणराज्य : या प्रकारात प्रत्येक व्यक्तीस मताधिकार, पण त्यांच्या प्रतिनिधींचे सोयीनुसार वर्गीकरण होऊन त्यांना शासनाधिकार दिला जाई.
३) पारमेष्ठ्य राज्य :या प्रकारात प्रत्येक ‘गृहपती’ला मताधिकार असे व ‘गृहपति’ शासन कार्यात प्रत्यक्ष भाग घेई.
४) कुलीन गणराज्य : ‘कुलपती’ हा मताधिकारी व शासन कार्यास पात्र मानले जात असे.
५) समंतपर्यायी गणराज्य : या प्रकारात केवळ सामंतांनाच (विशिष्ट भूभागांचे अधिकारी व स्वामी )मताधिकार असून त्यांच्यातच सर्वोच्च शासन असे.
६) संघराज्य :या प्रकारात अनेक गणराज्ये स्वखुशीने एकत्र येऊन मुख्य व बलवान झालेल्या शासनात भाग घेत.
गणराज्यांचे उल्लेख
गणराज्यांची अनेक नाणीही आता मिळाली आहेत. संघ किंवा गण या संज्ञांनी ही गणराज्ये ओळखली जात असत. यातील बहुतांश गणराज्ये आजचे उत्तर बिहार,सिंधू नदीचे खोरे व वायव्य प्रांत या भागात गुप्त काळापर्यंत होती,असे अभ्यासकांचे मत आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दोन प्रकारच्या संघांचा उल्लेख आलेला आहे. वार्ताशस्त्रोपजीवी संघ व राज शब्दोपजीवी संघ. वृक,दामणि व यौधेय हे पहिल्या प्रकारचे तर भद्र,वृजी, अंधक-वृष्णी इत्यादी दुसऱ्या प्रकारचे संघ होत. पहिल्या प्रकारच्या संघात सर्व नागरिक लढाऊ असत. दुसऱ्यातील संघातील संघप्रमुख नागरिकास राजा ही उपाधी लावण्यात येई. अंधक-वृष्णी गणराज्यात वासुदेव आणि उग्रसेन या दोन राज्यन्यांना अधिकार दिला होता.
बौद्ध साहित्यात उल्लेख असलेली शाक्य,कोलीय,लिच्छवी,विदेह,मल्ल इत्यादी गणराज्ये ही याच काळातील असावीत. शाक्य गणराज्यात ५०० नागरिकांची सभा व निर्वाचित राजा होता,तर वृष्णी हे आठ राज्यांचे संघराज्य होते. त्यात ७,७०७ राजांकडे सत्ता होती. अध्यक्ष,सेनापती वगैरे अधिकारी त्यातूनच निवडले जात. त्रिगर्तषष्ठ,पंचगण, सप्तगण ही सुद्धा अशा प्रकारची संघराज्ये होती.
इ.स.पू.पाचव्या ते पहिल्या शतकापर्यंतच्या गणराज्यांची माहिती ग्रीक लेखकांच्या वर्णनावरून मिळते. कठ गणराज्याने अलेक्झांडरशी लढा दिला. यौधेयांच्या सामर्थ्यामुळे अलेक्झांडरच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. शूद्रक,मालव आणि शिबी ही गणराज्ये अलेक्झांडरच्या आक्रमणास तोंड देण्यासाठी संघटित झाली होती. नंतर अलेक्झांडरशी तह करण्यासाठी त्यांनी आपल्या शंभर पुढाऱ्यांना सर्वाधिकार सुपूर्द करून पाठवले होते. याशिवाय पटल,अंबष्ठ,भागल इत्यादी गणराज्येही त्या काळात अस्तित्वात होती.
मौर्यकाल ते इसवी सन ३५० पर्यंतच्या काळात वरील गणराज्ये अस्तित्वात असावीत. सम्राट अशोकाच्या शिलालेखात योन,कांबोज,राष्ट्रिक,गांधार,पेत्तनिक,अपरांत इ.गणराज्यांचा उल्लेख सापडतो. अर्थशास्त्रात कुरु,पांचाल,मल्लक,वृज्जिक,लिच्छवी, मद्रक,कुकुर इत्यादी गणराज्यांचे उल्लेख आहेत.
संदर्भ ग्रंथ
मराठी
१- आंबेडकर,भी.रा.,(२००१),भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(अनु.)घनश्याम तळवटकर व इतर,नागपूर बुद्धिस्ट सेंटर,नागपूर.
२- नाडगोंडे,डॉ. गुरूनाथ,(२००३ तृ.आ.)भारतीय आदिवासी,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
३- पाटील,शरद,(१९८२),दास-शुद्रांची गुलामगिरी,प्राज्ञ प्रकाशन,वाई,जि.सातारा
४- मोतीचंद्र,(१०१८पुनर्मुद्रण),(म.भा.-मा.कृ.पारधी) साहित्य अकादेमी,नवी दिल्ली
५-व्हटकर,नामदेव,(१९९५)प्राचीन भारतीय लोकतांत्रिक शासनाचा इतिहास,मधुराज पब्लिकेशन्स,पुणे
६-शर्मा,रामशरण,प्राचीन भारतीय राजकीय विचार आणि संस्था,डायमंड पब्लिकेशन्स, पुणे,२००६
हिंदी
१- अग्रवाल,वासुदेवशरण(१९६९),पाणिनीकालीन भारतवर्ष,चौखम्बा विद्याभवन,वाराणसी.
२- चटोपाध्याय,देवीप्रसाद ,(२००५)राजकमल प्रकाशन,नई दिल्ली,पहला राजकमल संस्करण.
३- शर्मा,रामशरण,(२०११आवृत्ति नौवी ) प्राचीन भारत में भौतिक प्रगति एवं सामाजिक संरचनाएँ,राजकमल प्रकाशन,नई दिल्ली,.
४- सांकृत्यायन,राहुल,(२०१३ द्वितीय संस्करण),विनयपिटक,त्रिपिटक प्रकाशन प्रतिष्ठान,नागपूर.
इंग्रजी
1-Frazer,J.G.Totemism and Exogamy,Vol.II,(2009),Cosimo Publication,New York.
2-Freud, Sigmund,(1919),The Interpretation of Dreams, Avon Books, Inc.New York.
3-Ghurye, G.S.,(1962),Two Brahmanical Institutions Gotra And Charana,Popular Prakashan,Bombay.
4- Jayswal,K.P.,(1924),Hindu polity,BUTTARWORTH & Comp.Calcutta.
5-Majumdar,R.C.,(1922),Carporate life in Ancient India,Oriental Book Agency,Calcutta.
कोश वाङ्मय
१-भारतीय संस्कृति कोश,संपा-महादेवशास्त्री जोशी,(२००४ चतुर्थ आवृत्ती) भारतीय संस्कृति कोश मंडळ,पुणे,खंड २,
२-मराठी विश्वकोश,खंड ४संपा.लक्ष्मणशास्त्री जोशी,(१९७६),म.रा.सा.सं.मंडळ,मुंबई.
वेबसाईट
१-vishwakosh.marathi.gov.in/33919
पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 1 गण
लेखक- प्रा. डॉ. अशोक राणा
हे मुर्तीशास्त्राचे अभ्यासक आहेत. भारतीय मिथक शास्त्रावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.
हे पण वाचा
बैलपोळा भारतीय कृषी संस्कृतीतील अब्राह्मणी सण. बैलपोळा 2024
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 1
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 2
Malegaon protest – मालेगाव निषेध आंदोलन, 1
आमचे विडियो पाहण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा
YouTube – kanokan News
Instagram- kanokan News
Facebook- kanokan Topics