Site icon kanokannews

गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 4 संशोधकांनी शोधलेले गजाननाचे मूळ

गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 4 संशोधकांनी शोधलेले गजाननाचे मूळ

संशोधकांनी शोधलेले गजाननाचे मूळ

            गणपतीच्या गजानन रुपाचे मूळ शोधण्याचे श्रेय जाते,ते डॉ.जे.बर्जेस या पुरातत्त्व संशोधकाकडे. ई.स.१८८२ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार  ई.स.१८८६ मध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या “ The Buddhist Stupas of Amaravati  And   Jaggayyapeta ” या ग्रंथातील ३० व्या चित्रपत्रावर गजमुखी यक्षाची प्रतिमा मुद्रित केलेली आहे. गुह्य किंवा गण यासारखे तिचे रूप आहे. भारतीय प्राच्यविद्यासंशोधक डॉ.आनंद कुमारस्वामी यांनी आपल्या ई.स.१९२८ मध्ये प्रकाशित “ यक्षाज पार्ट-१” या शोधग्रंथात तिचा संदर्भ देऊन या गजमुखी यक्षापासून आजच्या गजाननाची प्रतिमा विकसित झाल्याचे सिद्ध केलेले आहे. त्यांच्या या मताशी सहमत नसणारे अनेक संशोधक आहेत. त्यापैकी कु.एलीस गेट्टी व फादर एच.हेरास हे प्रमुख होत.  हेरास यांनी कुमारस्वामी यांच्या मताला विरोध करताना यक्षांच्या यादीमध्ये गजमुखी यक्षाचा समावेश नसल्याचे कारण दिले आहे. (वास्तविक स्वतः कुमारस्वामीनीच तशी नोंद आपल्या ग्रंथात केली होती.)  हेरास यांच्या १९७२ मध्ये प्रकाशित “ प्रॉब्लेम ऑफ गणपती “ या शोधग्रंथात आपले या विषयीचे मत त्यांनी मांडले आहे. परंतु त्यांचे हे मत फारसे टिकणारे नाही. कारण की जैन धर्मामध्ये ‘ पार्श्व यक्ष या नावाच्या देवतेला आजही पूजिले जाते.

पार्श्व यक्ष व गणपती

जैनांचे २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा सहायक,संरक्षक आणि सेवक म्हणून पार्श्व यक्षाच्या मूर्ती जैन मंदिरांमध्ये आढळतात. आचार्य हेमचंद्र यांनी चतुर्भुजा पार्श्व यक्ष या नावाने प्रसिद्ध अशा या यक्षाचा रंग श्यामल असल्याचे म्हटले आहे. रोहतक येथे या यक्षाची एक प्राचीन प्रतिमा आढळली आहे. तेथे त्याला तीर्थंकर पार्श्वनाथाच्या मूर्तीच्या खाली कोरलेले आहे. जैन परंपरेला अनुसरून तयार केलेली पार्श्व यक्षाची प्रतिमा ग्वाल्हेर येथे प्राप्त झाली आहे. जैन ग्रंथांमध्ये या यक्षाविषयी ज्या कथा आढळतात, त्यानुसार मेघमालीन नावाच्या एका कपटी साधूने नागाच्या रुपात त्याला अग्नीमध्ये जाळले होते. हा नाग आपल्या पूर्व जन्मात पाताळात यक्षाच्या रुपात जन्मला होता. पार्श्व यक्षाचा संबंध या कथेमध्ये नागराज शेषाशी जोडला गेला आहे. त्यामुळे त्याच्या मूर्तीच्या अवतीभोवती अनेक नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्याच्या हातात नाग आणि मुंगुस दाखवून सामाजिक सदभावाचा संदेश दिला गेला आहे. पार्श्वनाथाला अनेकदा त्रास देणाऱ्या दुष्ट साधुपासून आपल्या स्वामीला वाचविण्याचे कार्य पार्श्व यक्षाने केले असे जैन धर्मीय मानतात. त्यामुळे तो जैन धर्मात पूजनीय ठरला आहे. त्याचे स्वरूप गजाननाशी हुबेहूब मिळते-जुळते आहे.    त्याला हत्तीची सोंड असून त्याच्या शिरामागे तीन किंवा सात फण्यांचा नाग दाखविला जातो. त्याला चार हात असून त्या हातांमध्ये बीजपूरक म्हणजेच म्हाळुंग नावाचे एक नारिंगी फळ,नाग आणि मुंगूस असतो. त्याचे वाहन कासव असते. हिंदू धर्मातील गणपतीचे वाहन उंदीर असते तसे येथे नसते. परंतु हिदू धर्मातील गजाननाशी त्याची तुलना केली जाते. या वास्तवाचा विचार केल्यास हेरास यांचे मत कुमारस्वामी यांच्या संशोधनास बाद करण्यास अपुरे पडते हे दिसून येते. हेरास यांनी गजाननाचे मूळ सांगण्याचा प्रयत्न केला आहे,त्याचा परामर्श थोडक्यात घेऊया.

हेरास यांच्या दृष्टीने गजाननाचे मूळ

११ सप्टेंबर १८८८ मध्ये स्पेन मधील बार्सिलोना येथे जन्मलेल्या हेन्री हेरास यांचा मृत्यू मुंबई येथे १४ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव एन्रिक हेरास दे सिकॅर्स असे होते.जेसुइट मिशनरी म्हणून कार्य सुरू केल्यावर त्यांनी आपले हेन्री हे ख्रिस्ती नाव स्वीकारले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये १९२२ साली त्यांची नेमणूक इतिहासाचा अध्यापक म्हणून झाली. त्यांना भारतीय इतिहासाचा अभ्यास करावयाचा असल्यामुळे त्यांनी आपल्या अध्यापनाचा विषय ‘ भारतीय इतिहास ‘ हा निवडला. इतिहासाच्या संशोधन पद्धतीवर त्यांनी ‘ रायटिंग ऑफ हिस्ट्री ‘ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी लिहिले. त्यांनी १९२६ मध्ये ‘इंडियन हिस्टोरिकल रिसर्च  इन्स्टिट्यूट ‘स्थापन केली. आज ही संस्था ‘ हेरास इन्स्टिट्यूट  ऑफ इंडियन हिस्ट्री अंड कल्चर ‘ या नावाने ओळखली जाते. १९३५ पासून त्यांनी मोहेंजोदडो आणि हरप्पा येथील उत्खननात आढळलेल्या अवशेषावर संशोधन सुरू केले. त्यातून त्यांनी भारतीय आणि सुमेरी व इजिप्ती तसेच मध्य आशियातील संस्कृतीतील साम्याचा शोध घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी १९४७ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. १९८१ मध्ये भारत सरकारने सिंधू मुद्रेच्या पार्श्वभूमीवर आधारित त्यांचे टपाल तिकीट प्रसृत केले. त्यांच्या निवडक ग्रंथांपैकी एक “ द प्रॉब्लेम ऑफ गणपती “हे पुस्तक आहे. त्यातील पृ.क्र.४६ ते ५४ मध्ये त्यांनी गणपतीविषयक पुराकथांचा परामर्श घेऊन गजाननाचे मूळ सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

गणेशाचे रूप यक्षासारखे नसून ,गणेशविषयक मिथकेसुद्धा त्याचा यक्षांशी संबंध जोडीत नाहीत,असे ते म्हणतात. कुमारस्वामी प्रमाणेच एलीस गेट्टी यांचे मतही त्यांनी खोडले आहे. गेट्टी यांच्या मते, गणेशाचे रूप म्हणजे मुळात द्रविड लोकांचे एक कुलचिन्ह होय. परंतु त्याच्याशी संबंधित कोणताही पुरावा द्रविडांच्या कुलचिन्हांमध्ये नसल्याचे हेरास म्हणतात. गज किंवा खसा या नावाच्या जमाती भारतात होत्या,परंतु मानवी शरीर आणि हत्तीचे मुख असलेले दैवत त्यांच्यामध्ये नव्ह्ते असे त्यांनी म्हटले आहे. गेट्टी यांनी विष्णूच्या पशु अवतारांची पूजा काही हिंदू मंदिरांमध्ये होत असल्याचे पाहून हा निष्कर्ष काढला होता. परंतु पशुपूजेचा स्पष्ट पुरावा प्राचीन भारतात आढळत नाही,असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे काही लेखकांनी प्राचीन भारतातील द्रविड या मूलनिवासिंचे दैवत गणेश होते असे म्हटले आहे. त्याचा प्रतिवाद करताना हेरास म्हणतात की,भारतातील त्या सर्व तथाकथित मूलनिवासी जमाती द्रविडांपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांच्यामधील दैवी उपासनांचे अवशेष द्रविडपूर्व सिंधू संस्कृतीच्या शहरांमध्ये आढळत नाहीत. कोणत्याही मानववंशशास्त्रज्ञाने अशा हत्तीसदृश दैवताचे अस्तित्व मूलनिवासी जमातींमध्ये आढळत असल्याचे मान्य केले नाही.

एच.हेरास यांचे हे मत आज अनेक पुराव्यांनी बाद झाले आहे. कारण की सिंधू संस्कृतीतील संशोधनातून गजमुखी मुखवटा प्राप्त झालेला आहे. त्यावरून गजमुखी दैवताची उपासना सिंधू संस्कृतीतील लोक करीत असावेत असा निष्कर्ष काढायला बराच वाव आहे.

गजमुखासूर व गणपती

आपल्या विवेचनाच्या ओघात हेरास यांनी  दक्षिण भारतीय दंतकथेतील एका दुय्यम दैवताचा  उल्लेख केला आहे. आपल्या सोंडेने तो गजमुखासूर नावाच्या राक्षसाला फेकून देतो. नंतर गणेश आपले वाहन म्हणून उंदराचा स्वीकार करतो. (तळटीपेत त्यांनी छोटा नागपूर येथील मुंडा आणि इतर मूलनिवासी जमातींमधील उंदीर या कुलचिन्हाच्या अस्तित्वाबद्दलची नोंद रिस्ले यांच्या “ Tribes and Castes of Bengal ” या ग्रंथाच्या आधारे केली आहे.) प्राथमिक अवस्थेत एक दुय्यम दैवत म्हणून गणपतीचे वर्णन या ग्रंथांमध्ये आलेले असले तरी या आधारे ते गणपतीचे मूळ आहे असे म्हणता येत नाही असे हेरास म्हणतात. यक्षासारखे तसेच आदिम संस्कृतीतील निसर्गपूजेशी संबंधित कुलचिन्ह सदृश रूप गणपतीचे असले तरी या पद्धतीने या दैवताचे मूळ शोधणे अधिक गुंतागुंतीचे ठरणार आहे असे ते म्हणतात. त्यांनी यासाठी वेगळी पद्धत सांगितली आहे. सिंधूलिपीतील ’अने’ या शब्दाचा अर्थ हत्ती या अर्थाशी निगडीत आहे. त्याला ‘ईल’ हा प्रत्यय लागून ‘अनिल’ हा शब्द तयार होतो आणि त्याचा अर्थ ‘ हत्तीचे ‘ असा होऊ शकतो. त्यातच गणपतीचे मूळ असू शकते. ‘गजस्य’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘हत्तीचे’ असा होत असून या दैवतासाठी तो वापरण्यात येत असे. देवाचा मुलगा या अर्थाच्या या शब्दामुळे त्याचे मुख हत्तीचे आणि शरीर मानवाचे दाखविले जात असावे असे त्यांनी म्हटले आहे. देवाला मानवी रुपात दाखविण्याची रीत असल्यामुळे तसे केले जात असावे,असे त्यांचे मत होते.

हेरास पुढे म्हणतात की,या सर्व हत्तीविषयक धार्मिक धारणा भारतातील नाग जमातीमध्ये प्रचलित गजाच्या वर्तनविषयक समजुतींची निर्मिती आहेत.  कार्तिकेयाच्या चेहऱ्याला हत्तीचे मुख लावण्याचे श्रेय या जमातीच्या शिल्पकारांना जाते. हत्तीमुख दैवताच्या निर्मितीमागील कारणे सांगणाऱ्या कथा त्यानंतर लोकांमध्ये प्रसृत झाल्यात.   अनिल किंवा गजस्य हा हत्तीचा पुत्र होता व पार्वतीने त्याला आपला पुत्र मानले आणि शिवाने त्याला पार्वतीचा पुत्र म्हणून स्वीकारले.  शिवाला मुरुगन म्हणजेच कार्तिकेय हा एकच पुत्र होता.  या गजमुखी मुलाला पार्वतीचा पुत्र म्हणून जनमानसाने स्वीकारले. नंतर रचलेल्या पुराकथांमध्ये तो दोघांचाही मुलगा आहे हे सांगण्यात आले व ते ही शिवाच्या मुखाद्वारे.  मुळात तो नाग जमातीचा होता, हे स्पष्ट करण्याकरिता त्याच्या पोटाभोवती आणि गळ्याभोवती नाग दाखविण्यात येतात. नेपाळमध्ये शेषनागाला गणपतीच्या स्वरूपात नर्तन करताना दाखविले जात असल्याची माहिती कु.गेट्टी यांनी दिलेली आह्रे. त्यांनी एका गूढ संप्रदायात गणपतीची पूजा धातूच्या प्रतिमेत त्याच्या शिरावर असलेल्या पाच नागफण्याच्या स्वरुपात केली जाते असे नमूद केले आहे. आपल्या संग्रहातील एक गणपती प्रतिमा अतिशय आदिम स्वरूपातील असून तीमध्ये नागाने आपला फणा मूर्तीच्या मस्तकावर पूर्णपणे पसरविला आहे.असे हेरास म्हणतात. दुसऱ्या एका प्रतिमेमध्ये गणेशाच्या दोन हातांच्या कोपऱ्यातून  नागमुखे बाहेर निघालेली दिसतात.  कु.गेट्टी यांनी सुद्धा एक गोष्ट नोंदविली आहे व ती म्हणजे  उघड्यावर झाडाखाली किंवा शेतामध्ये  गणपतीच्या प्रतिमा आढळतात,तेव्हा नागशिळा त्याठिकाणी असते. वेरूळ आणि ब्रह्मदेश येथील नाग प्रतिमेच्या दोहोबाजूला मगर दाखविलेले दिसतात. मगर ही एक प्राचीन नाग जमात असल्याचे हेरास यांनी म्हटले आहे. नाग जमातीचा गणपतीशी असलेला संबंध दर्शविण्याकरिता त्यांनी समुद्र्गुप्ताने ज्याला सत्ताविहीन  केले होते, अशा ‘गणपतीनाग’ या नागराजाचा संदर्भ दिलेला आहे.

हेरास यांच्या विवेचनातील कच्चे दुवे

प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या संशोधनात फादर हेरास यांनी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. गणपतीचे मूळ शोधण्याच्या त्यांच्या प्रयत्नालाही एक ऐतिहासिक महत्त्व आहे,यात शंका नाही. त्यांच्या या कार्याप्रती आदर व्यक्त करून पुढील विवेचन करीत आहे.   कुमारस्वामी आणि गेट्टी यांच्या मताशी असहमती व्यक्त करताना त्यांनी काही विधाने केली आहेत,ती मात्र ऐतिहासिक संशोधनाशी सुसंगत नाहीत ; म्हणून त्याविषयी स्पष्टीकरण देणे एवढाच हेतू यामागे आहे. गेट्टी यांनी गणपतीच्या मुळाशी भारतातील पशुपूजा हे एक कारण असल्याचे मत आपल्या ‘गणेशा’ या शोधग्रंथात मांडले आहे. त्याला विरोध करताना हेरास यांनी ’ पशुपूजेचा स्पष्ट पुरावा प्राचीन भारतात आढळत नाही ’, असे म्हटलेले आहे. वास्तविक जगातील सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये पशुपूजा अस्तित्वात होती. विशिष्ट पशुमध्ये अलौकिक शक्ती असते आणि तिला प्रसन्न करायचे झाल्यास त्या पशूची पूजा केली पाहिजे अशी धारणा काही धर्मांमध्ये आजही प्रचलित आहेत. त्यातूनच देवक म्हणजेच कुलचिन्ह (totem) संकल्पना निर्माण झाली. या कुलचिन्हांचे मुखवटे घालून आपले धार्मिक कार्य करण्याच्या प्रथा जगभर अस्तित्वात आहेत. विशेषतः आदिम जमातींमध्ये त्या आढळतात. या कुलचिन्हांची उपासना करण्यातूनच दैवतांची निर्मिती झाली,हे जगातील बहुतांश मानववंशशास्त्रज्ञानी मानले आहे. यावरील संशोधने हेरास यांच्या काळातही उपलब्ध होती,तरीही त्यांनी असे विधान करावे याचे आश्चर्य वाटते. सिंधू संस्कृती ही द्रविड संस्कृती होती,असे अभ्यासक मानतात. या संस्कृतीच्या उत्खननात अनेक पशु-पक्षांचे मुखवटे प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे द्रविड संस्कृतीत  त्याच्याशी संबंधित कोणताही पुरावा द्रविडांच्या कुलचिन्हांमध्ये नसल्याचे हेरास म्हणतात,हे पटण्यासारखे नाही.  सिंधू संस्कृतीच्या उत्खननात एक गजमुखी मुखवटा आढळला आहे. त्यामुळे गजमुखी गणपतीचे मूळ पाच हजार वर्षांपूर्वीपर्यंत शोधले जाणे शक्य आहे असे अभ्यासकांचे मत आहे. हेरास यांनी सिंधू संस्कृतीला द्रविडपूर्व मानले आहे. त्याप्रमाणे यक्ष आणि नाग हेही द्रविड संस्कृतीतील होत हे त्यांचे मत मान्य करण्यात काही अडचण नाही.त्यांच्यात हेरास यांनी फरक केला आहे,ते मात्र चुकीचे आहे. यक्षसंस्कृतीची निर्मिती म्हणजे नाग संस्कृती होय,हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

यक्ष व नाग यांच्यातील संबंध

यक्ष या शब्दाचा वैदिकांनी प्रचलित केलेला अर्थ “पूजाविधी करणारे”असा होतो. वैदिकांचे धर्मविधी यज्ञविषयक कर्मकांडाशी निगडीत होते. त्यांच्यापेक्षा वेगळे असे लोक असे त्यांना या शब्दाद्वारे सूचित करायचे होते. परंतु अभ्यासकांनी यक्ष हा शब्द संस्कृत भाषेतील नसून आर्यपूर्व निषाद भाषेतील असावा असा कयास व्यक्त केला आहे. तसेच त्याचा अर्थ ज्ञानी असा होतो असे म्हटले आहे. त्यामुळेच यक्षांना विद्याधर या शब्दानेही संबोधलेले दिसून येते. हाच शब्द बरेचदा नाग कुलचिन्ह असलेल्या लोकांसाठीही वापरण्यात येत असे.त्यामुळे यक्ष व नाग हे एकाच मानवी समूहाचे भाग होते हे स्पष्ट होते. रांगेय राघव यांनी आपल्या “प्राचीन भारतीय परंपरा और इतिहास” या ग्रंथामध्ये यक्ष हे द्रविडांच्याही आधी भारतात राहणारे लोक होते असे म्हटले आहे. आर्यांच्या आधी भारतात द्रविड आलेत . त्यांच्याही आधी येथे वस्ती करणाऱ्या लोकांना ऑष्ट्रलायिड या नावाने ओळखले जाते. त्यांच्यासाठी मूलनिवासी हा शब्द त्यांनी वापरला  आहे. यक्ष व नाग यांच्याविषयी पृ.१००वर ते म्हणतात,’यक्ष नागोंके साथ भी गिनाये जाते है.”

 

नाग व यक्ष यामधील संबंधावर भरपूर पुरावे उपलब्ध आहेत,परंतू स्थळाअभावी याठिकाणी ते देणे शक्य नाही. जलरक्षक नाग आणि यक्ष हे एकच होत असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये नाग हे जलरक्षक म्हणून पूजिले जातात. महाभारतातील यक्ष हा जलरक्षक मूलनिवासी होता. त्यामुळेच त्याच्या परवानगीशिवाय तळ्याचे पाणी पिणाऱ्या पांडवांना त्याने शिक्षा केली. यक्ष हे आपापल्या कुलचिन्हांचे मुखवटे आपल्या चेहऱ्यावर परिधान करीत असत. त्यामुळे वैदिक व पौराणिक साहित्यात त्यांचे वर्णन पशु-पक्ष्यांच्या रुपात केलेले आढळते. त्यांनी वैदिकांशी बराच काळ संघर्ष केला असावा. त्यामुळे वैदिकांनी आपल्या साहित्यात त्यांची वर्णने विकृत स्वरुपात केलेली आहेत. या उलट बौद्ध व जैन साहित्यात त्यांना सन्मानाने संबोधलेले आढळते. वैदिकेतर मूलनिवासी लोकांनी जैन व बौद्धांशिवायही आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्यांच्या धर्माचे आजचे स्वरूप म्हणजे हिंदू धर्म होय. या धर्मातील गजानन गणपती,हनुमान,वराह,नारसिंह इ.दैवते ही यक्ष संस्कृतीतील आहेत असे अभ्यासकांचे मत आहे. नारसिंह या शब्दाचा अर्थ पाण्याचा मालक असा होतो. त्याच्याशी जोडला गेलेला एक गणपती आपणास महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पहावयास मिळतो.

नृसिंह-विनायकाची आगळी-वेगळी मूर्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात भू या नावाचे एक गाव आहे. शिल्पा हडप या विदुषीने तेथील  नृसिंह-विनायकाची आगळी-वेगळी मूर्ती प्रकाशात आणली. बुलेटीन ऑफ द डेक्कन कॉलेज,७२-७३(२०१२-१३)या संशोधन पत्रिकेतील पृ.२६७ वर त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झालेला आहे. मानवी शरीर आणि पशुचा चेहरा असलेल्या अनेक मूर्ती आपणास भारतात पहावयास मिळतात. हत्तीचे मुख असलेल्या मूर्ती प्राचीन काळापासून निर्माण होत  आहेत. परंतु सिंह आणि हत्तीच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेली ही मूर्ती मात्र आगळी-वेगळी आहे.

तिचे डोळे सिंहासारखे उभे कोरण्यात आलेले आहेत. भू येथील लक्ष्मीकांत मंदिरात असलेल्या या मूर्तीचे कान लहान आहेत. हत्तीपेक्षा तिचे साधर्म्य सिंहाशी अधिक आहे. परंतु सोंडेवरून आपण ती गणेशाची आहे, हे समजू शकतो. हत्ती व सिंह या दोन्ही प्राण्यांची शक्ती आपणास लाभावी या हेतूने या मूर्तीची निर्मिती केली गेली असावी. तिला चार हात असून त्यापैकी वरच्या उजव्या हातात शंख, डाव्या हातात चक्र तर खालील उजव्या हातात असलेल्या खाद्यपदार्थाकडे सोंड वळलेली आहे.  या मूर्तीच्या हातातील शंख आणि चक्र हे विष्णूचे प्रतीक आहेत,तर खाद्यपदार्थ आणि त्याकडे वळलेली सोंड हे गणपतीचे. विष्णू आणि गणेशाच्या एकत्रीकरणाचे स्पष्टीकरण देणारी कथा पुराणांमध्ये आलेली आहे.

एकदा विश्वदेव गौरीकडे येऊन भगवान विष्णूच्या दर्शनाशिवाय फळे खायला नकार देतो,तेव्हा गणेश आपले मूळ स्वरूप टाकून विष्णूच्या रुपात त्याच्यासमोर येतो. तेव्हा विश्वदेव त्याला आपला पूर्वज म्हणून स्वीकारतो. त्यानंतर गणेश आपल्या मूळ रुपात परत येतो आणि त्याचे भक्त गणेश आणि नारायणाची पूजा करीत आहेत असे दृश्य दाखवितो. ते पाहून विश्वदेव त्यांच्यामध्ये काही फरक नाही हे मान्य करतो. ब्रह्मवैवर्त पुराणात याचे स्पष्टीकरण करणारी वेगळी कथा आहे. या कथेनुसार पार्वती पुत्रप्राप्तीकरिता शिवाच्या सल्ल्यानुसार पुण्यक व्रत करते,त्यामुळे श्रीहरी तिला प्रसन्न होऊन श्रीकृष्ण तुझ्या पोटी जन्म घेईल आणि तो भूतांचा राजा होऊन गणेश या नावाने प्रख्यात होईल असा वर देतो. सर्व प्रकारच्या विघ्नांना तो दूर करील आणि विघ्न- निघ्न, लंबोदर, एकदंत आणि गजानन या नावांनी ओळखला जाईल असे तो म्हणतो.

या तशाच या सारख्या कथांमधून गणपतीच्या अशा रूपाचे स्पष्टीकरण करणे ही पुराणिकांची प्रवृत्ती आहे. वास्तविक दोन कुलचिन्हाचे लोक एकत्र आलेत तर अशा प्रतिमा तयार केल्या जातात आणि त्यांना अवतारवादाचा मुलामा देण्यात येतो. शिल्पा हडप यांनी या मूर्तीच्या निर्मितीमागे यक्ष संस्कृतीतील दैवतांचे विनायक आणि नारसिंह या दैवतांमध्ये विलीनीकरण होणे हे कारण असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्याचप्रमाणे दोन परस्पर विरुद्ध सम्प्रदायांमधील संघर्ष संपल्याचे प्रतीक म्हणूनही या प्रतिमांकडे पाहिले पाहिजे असे म्हटले आहे. यावरून आपणास प्राचीन यक्ष संस्कृतीचा परिचय व्हायला मदत होते, कुमारस्वामी यांच्या यक्ष संशोधनाला आज सर्वत्र मान्यता मिळाली आहे. याउलट फादर हेरास यांचे मत फारसे स्वीकारले गेले नाही.

आनंद कुमारस्वामी यांचा गजमुखी यक्ष

आनंद केंटीश कुमारस्वामी यांचा जन्म २२ ऑगस्ट १८७७ रोजी कोलंबो येथे तर मृत्यू ९ सप्टेंबर १९४७ रोजी अमेरिकेतील निध्याम येथे झाला. श्रीलंका आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व त्यांनी स्वीकारले होते. इंग्रजी आई आणि हिंदू वडील यांच्या पोटी आलेल्या या महान प्राच्यविद्यासंशोधकाने कला,इतिहास,संस्कृती या क्षेत्राला आपल्या लेखनाने समृद्ध केले आहे.  ‘डान्स ऑफ शिवा  ‘ हा त्यांचा नटराजाच्या मूर्तीचे स्पष्टीकरण करणारा ग्रंथ कलास्वादासाठी उपकारक  ग्रंथ ठरला आहे,तर यक्षावरील त्यांची दोन पुस्तके यक्षांच्या महान संस्कृतीला न्याय देणारी आहेत.

यक्ष-पार्ट १ हा त्यांचा प्रस्तुत विषयावरील पहिला ग्रंथ वाशिंग्टनच्या स्मिथ्सोनिअन संस्थेने १९२८ मध्ये प्रकाशित केला . या ग्रंथातील पृ.७ वर आंध्रप्रदेशमधील अमरावती या प्राचीन गावातील बौद्ध स्तूपाच्या अवशेषात आढळलेल्या गजमुखी यक्षाच्या प्रतिमेवरून गजाननाचे मूळ या प्रतिमेत आहे हे सिद्ध केले. त्याच्या मोठ्या पोटावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला. यक्षाचा राजा कुबेर किंवा मणीभद्र यक्षासारखे त्याचे  रूप आहे असे ते म्हणतात.

ई.स.पूर्व १०० ते २०० या कालावधीत निर्माण झालेल्या या स्तूपाचे मूळ स्वरूप आज शिल्लक नाही. तरीही तेथील अवशेषांवरून त्याच्या भव्यतेची जाणीव आपणास होते. येथे आढळलेली गजमुखी यक्षाची प्रतिमा सर्वात जुनी असल्यामुळे गजाननाचे ते आद्य रूप आहे असे अभ्यासक मानतात. राजस्थानातील जयपूर जवळील रेढ या पुरातत्वीय स्थळी ई.स.पूर्व पहिल्या शतकातील गजमुखी यक्षप्रतिमा  आढळली आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील मथुरा येथील शिलापट्टावर गजमुखी यक्षाची प्रतिमा प्रतिमा आहे त्यानंतर गजाननाच्या मूर्ती बनविण्याची प्रथा पडली. महाराष्ट्रातील वेरूळ येथील बौद्ध गुहेत गजमुखी यक्ष दिसून येतो. चीनमधील मोगावो गुहेमध्येही गजमुखी गणेशाची मूर्ती ई.स.सहाव्या शतकात कोरण्यात आली. पाचव्या-सहाव्या शतकातील गुहांमध्ये आढळलेल्या गणेश मुर्तीवरही यक्ष प्रतिमांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे कुमारस्वामी यांनी मांडलेल्या गजमुखी यक्षाच्या संशोधनाचे महत्व पटल्याशिवाय राहात नाही. डॉ.आनंद कुमारस्वामी यांनी पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे गजाननाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याला विद्वानांची मान्यताही प्राप्त झालेली आहे. गजाननाच्या निर्मितीमागील अनेक सिद्धांत आजवर अभ्यासकांनी मांडलेले आहेत. त्यापैकी लोकपरंपरेतील जोकुमारस्वामी या लोकदैवताविषयीचा सिद्धांतही अभ्यासण्यासारखा आहे. म्हणून त्याचा परामर्श याठिकाणी घ्यायला हरकत नसावी.

लोकपरंपरेतील जोकुमारस्वामी

‘ गणपती बाप्पा मो SSS रया’ असं कुणी म्हटलं की, आपण उत्स्फूर्तपणे ‘पुढच्या वर्षी लवकर या SSS’ असं म्हणतो.  हा उत्स्फूर्त प्रतिसाद गणपतीच्या निरोपाचा सूचक असतो. गणेश चतुर्थीला स्थापन झालेल्या गणेशाला आपण अनंत चतुर्दशीला उत्थापन देतो.   दीड दिवस तसेच त्यापेक्षा जास्त दिवस काही घरी गणपती मुक्कामाला असतो.  अशा उत्सवी गणेशाला निरोप देताना उत्साही भक्तांना थोडे दु:ख नक्कीच होत असणार. परंतु एक अपरिहार्य घटना म्हणून हे दु:ख पचविण्याची तयारी ते वरील वाक्याच्या द्वारे करीत असतात.   या वाक्यात पुढच्या वर्षीची म्हणजे एका वर्षाची मुदत गणपतीला भक्तांनी दिली आहे.  अर्थात या मधल्या काळात त्याने आपणास तोंड दाखवू नये,असेच त्यांना सुचवायचे असावे.  परंतू,ही भावना त्यांच्या मनात नसते.  ते हे वाक्य खेळाडू वृत्तीने घेतात,कारण की ; मातीच्या गणपतीला वर्षभर घरात किंवा मंडपात ठेवणे त्यांना सोयीचे नसते.    त्यामुळे त्याचे विसर्जन करणे ही आवश्यक बाब होऊन बसते.  हा व्यवहार पार पाडताना गणेश भक्त ज्या गणपतीची दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा-आरती करतात,त्याला कठोरपणे विहीर किंवा जलाशयांमध्ये झोकून देतात.    त्यावेळी गणपतीची सोंड,हात,पाय किंवा इतर अवयवांना इजा होईल याची त्यांना थोडीही जाणीव नसेल काय ?     संत गाडगेबाबांनी अशा निर्दयी गणेश भक्तांना आपल्या अखेरच्या कीर्तनात खडे बोल सुनावले होते.   ते म्हणतात :

‘ हे गणपतीची-गणपती बसोनं देवाची भक्ती नाही. हे एक रूढी पडली.  काय पडली ?

-रूढी !

हां ! गणपती बसोनं देवाची भक्ती नाही. ज्या वक्ती गणपतीले आणता – ब्यांड लावता,भजन लावता,अन वाजवत वाजवत आनता.

मोरया…मोरया… मो SS र या !’

आनून शिंहासनावर बसवता. अन त्याची पूजा करता-निवद,मोदक,आरत्या-शेवटच्या रोजी उठवता की नाही ?

–  हो S !

मंग त्याले कुठी घेता ?

-डोक्याव S र  !

बोला ?

-डोक्याव S र  !

अन मंग कुकडे लांबोता ?

मोरया…मोरया… मो SS र या !

एवढ्या पान्यात- मोरया ! चले जाव !

हे देवाची भक्ती नाही. ज्याची एवढी शोभा केली,ज्याच्या आरत्या केल्या अन त्याले पान्यात बुडवून मारता ? तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते.  देवाची भक्ती नाही…. देवाची भक्ती भजन !

गोपाला गोपाला – देवकीनंदन गोपाला .’

 

संत गाडगेबाबा यांच्या मनात आलेले हे विचार जगावेगळे आहेत,असे आपणास वाटेल. परंतु,तटस्थपणे विचार करणाऱ्या कुणाच्याही मनात तसे विचार येऊ शकतात हे आपल्या लक्षात येईल.  ज्याला आपण श्रद्धेने ओवाळतो,त्याला कठोरपणे जलाशयांमध्ये ढकलून देतो, अशी परस्पर विरुद्ध कृती आपण का करतो ?  विशेष म्हणजे पुराणांमध्ये गणेश जन्माच्या कथा आढळतात,तशा विसर्जनाच्या कथा आढळत नाहीत. जन्मलेल्या प्रत्येकाला मरण येणे स्वाभाविक असते,या न्यायाने कदाचित विसर्जनाची कृती भाविक करीत असतील काय ? किंवा विसर्जनातून नव्या सर्जनाची अपेक्षा सूचित होते काय ? असे कितीतरी प्रश्न या कृतीतून निर्माण होऊ शकतात व त्यांची उत्तरे अभ्यासकांनी आपापल्या अभ्यासक्षेत्राच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

गणेशाच्या महात्म्यावर आधारित पुराणांमध्ये त्याच्या निर्मितीच्या कथा सांगितल्या आहेत. त्या कथांमध्ये सुसंगती नसली तरी त्यामधून एक सामान्य सूत्र आपणास दिसून येते व ते म्हणजे गणेशाचे मूळ मस्तक नाहीसे होणे. काही कथांमध्ये ते शिवाने कापले तर काहींमध्ये शनीच्या कोपाने  किंवा पार्वतीच्या इर्षेने नाहीसे झाले असे वर्णन आढळते. या सामान्य सूत्रातून आपणास कोणत्यातरी गोष्टीच्या निषेधाचा सूर निघत असल्याचे स्पष्ट होते.  मानवशास्त्रज्ञांनी या कृतीला प्रतिकात्मक मृत्यू व पुनरुज्जीवनाचा संकेत म्हणून संबोधले आहे. जेम्स जॉर्ज फ्रेझर यांच्या ‘ The Golden Bough ‘ या ग्रंथामध्ये यावर मानवशास्त्रीय दृष्टीकोनातून मांडणी केली आहे,तर ’सिग्मंड फ्राईड यांच्या  ‘Totem and Taboo’ या ग्रंथात या विषयावर मानसशास्त्रीय विचारातून विस्तृत चर्चा केलेली आहे.   हत्ती हे एक मानवी समूहाचे कुलचिन्ह होते हे वास्तव लक्षात घेतले म्हणजे  या चर्चेची खोली आपल्या लक्षात आल्यावाचून राहात नाही.  लोकसंस्कृती आणि पुराकथा यांच्या अभ्यासासाठी पुरातत्त्व व इतिहास याप्रमाणेच मानवशास्त्र आणि मानसशास्त्र या विद्याशाखांचाही अभ्यास आवश्यक असतो.

गणपतीचे मूळ शोधण्याच्या प्रक्रियेत लोकपरंपरेचाही अभ्यास आपणास सहायक ठरतो.  कारण की, प्राचीन ग्रंथांमधील कथांव्यतिरिक्त वेगळ्याच कथा लोकपरंपरेत रूळलेल्या असतात. त्याचप्रमाणे त्यांच्याशी संबंधित विधिनाट्यांचे स्वरूपही वेगळे असते. ते कसे, हे आपण कर्नाटकातील जोकुमारस्वामी या आगळ्या-वेगळ्या दैवताच्या संदर्भात पाहूया. या विषयीची माहिती पं.महादेवशास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशामध्ये दिली आहे.

संस्कृती कोशामधील जोखमार 

भारतीय संस्कृती कोशाच्या तिसऱ्या खंडातील पृ.६७१ वरजोखमार’ या शीर्षकाखाली जी माहिती आलेली आहे,तीमध्ये एक क्षुद्रदैवत या नात्याने जोकुमारस्वामीचा  उल्लेख करण्यात आलेला आहे. कर्नाटकातील ब्राह्मण,धोबी इ.जातीचे लोक याला भजतात असे सांगून पं.महादेवशास्त्री  जोशी म्हणतात, ” याची कथा अशी-

गणपती,कार्तिकस्वामी यांच्याप्रमाणेच जोखमार हाही शंकराचाच मुलगा होता. तो अंगाने गणपतीपेक्षा कृश होता. खेळताना तो हमखास चिडे. एके दिवशी तो नदीवर आंघोळीसाठी गेला असताना त्याला तिथे एक धोबीण दिसली. तिच्यावर मोहित होऊन जोखमाराने तिचा हात धरला. जवळच उभ्या असलेल्या त्या स्त्रीच्या नवऱ्याने ते पाहिले व त्याचा संताप अनावर झाला. त्याने जोखमाराचे डोके ठेचून त्याला ठार मारले. पण तोच जोखमार धोबी जातीचा कुलदेव बनला.

कुंभार लोकही त्याला आपला आदिदेव मानतात. ते लोक भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या आधी जोखमाराची मूर्ती बसवून तिची पूजा करतात. जोखमार घरात असेपर्यंत गणपतीला झाकून ठेवतात व मोदकांचा नैवेद्य दाखवीत नाहीत. ज्यांच्या घरी त्याचा कुलाचार असतो,त्यांना जोखमाराच्या विसर्जनानंतर तीन दिवस सुतक पाळावे लागते.

जोखमाराचे विसर्जन करावयाच्या वेळी त्याची मूर्ती नदीवर नेऊन तिचे डोके ठेचतात. जोखमार म्हणजे नक्की कोणता देव ते कळत नाही. तो एखादा यक्ष कुमार किंवा मदन असावा असा एक समज प्रचलित आहे.”  महाराष्ट्र लोकसाहित्य माला,पुष्प ३, महाराष्ट्र लोकसाहित्य समिती,१९५९, या ग्रंथाच्या आधारे ही माहिती पं.महादेवशास्त्रींनी दिलेली आहे.   या माहितीत जोखमार या शब्दातून त्याचा यक्षाशी संबंध जोडण्यात आला आहे. तसेच त्याच्या कामपिपासू वृत्तीमुळे तो मदन असावा असेही ते म्हणतात. अर्थात प्रचलित समजुतीच्या आधारे तशी नोंद त्यांनी केली आहे.  या माहितीचा मागोवा घेत लोकसाहित्याचे संशोधक डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी आपले संशोधन मांडलेले आहे .

लोकदेव जोकुमार आणि गणेश

या शीर्षकाखालील ‘ लोकसाहित्य : संशोधन आणि समीक्षा ‘ या ग्रंथामध्ये पृ.११९ वर प्रकाशित लेखामध्ये डॉ.शिंदे  म्हणतात, “ जोकुमारस्वामी हे प्राचीन काळापासून लोकजीवनात प्रतिष्ठा पावलेले आणि पूजाविषय झालेले एक लोकदैवत आहे. त्याचे रूप अदभूत आणि आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात कारवारपासून बिदरपर्यंत सुमारे शंभर कि.मी.रुंदीच्या प्रदेशामध्ये आजही जोकुमारस्वामीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत असा एकूण सात दिवस हा उत्सव असतो. कधी काळी सार्वजनिक स्वरुपात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाला आता मर्यादित स्वरूप आलेले असले,तरीही बिदर ,रायचूर, बल्लारी, गुलबर्गा, विजापूर, बेळगाव,धारवाड,शिमोगा ,कारवार या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील काही भागामध्ये जोकुमारस्वामीचा पूजा उत्सव आजही चालू असून खेड्यापाड्यातील लोक अत्यंत श्रद्धेने जोकुमारस्वामीची पूजा करतात. जोखमार,जोकुमार या नावाने जोकुमारस्वामी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ओळखला जातो.”

जोकुमारस्वामीची उपासना लोकपरंपरेत रुजलेली असली तरी तिचा शिलालेख, दानलेख, ताम्रपत्र, अग्रहार अशा कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये निर्देश नाही,असे डॉ.शिंदे म्हणतात. मात्र बाराव्या शतकापासून प्राचीन कन्नड ग्रंथांमध्ये जोकुमारस्वामीचा उल्लेख आढळतो. श्रीधराचार्य यांनी इ.स.१०४९ मध्ये  ‘जातकतिलक ’ नावाचा ग्रंथ लिहिला असून त्यात जोकुमारस्वामीचे जन्मजातक कथन केले आहे तसेच त्याला केवळ सात दिवसांचे अल्पायुष्य का लाभले याची मीमांसा केली आहे .   याशिवाय बंधुवर्मा याने रचलेला “जीवन संबोधन “(इ.स.११५०),ब्रह्मशिव याचा “समयपरीक्षे” (इ.स.११८०), पार्श्वकवीचा “पार्श्वनाथ पुराण” (इ.स.१२२२),नरसिंह कवीचा ‘अनुभव शिकामानी’ (इ.स.१७६८) या ग्रंथातील उल्लेख जोकुमारस्वामीच्या क्षुद्रतेची जाणीव करून देणारे आहेत.   महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्यात आणि विजयदास यांच्या कन्नड अभंगांमध्ये जोकुमारस्वामीचा निर्देश आला आहे  याविषयी माहिती देताना डॉ.शिंदे पुढे म्हणतात,” जेव्हा एखाद्या देवतेची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा ग्रामीण समाजात वाढू लागते तेव्हा धार्मिक जीवनाच्या उच्च स्तरात त्याच्याविषयी विरोधाचा सूर उमटू लागतो. महाराष्ट्रात खंडोबाबाबत असेच घडले होते याची माहिती अभ्यासकांना निश्चितच आहे.”

जोकुमारस्वामी या लोकदैवताबद्दल प्रस्थापितांच्या साहित्यात नकारात्मक माहिती आढळत असली तरी त्याची लोकप्रियता बाराव्या शतकाआधी कळसाला पोचली असावी,असे सांगून डॉ.शिंदे यांनी कानडी साहित्यातून व्यक्त झालेल्या जोकुमार विषयीच्या एका आख्यायिकेची माहिती दिली

जोकुमारस्वामीची कानडी आख्यायिका

स्वर्गातील सप्तऋषी पृथ्वीलोकाविषयी चर्चा करत होते. त्यांची चर्चा ‘ जक्क ‘ नावाचा त्यांचा सेवक ऐकत होता. ऋषी चर्चा करत होते की,स्वर्गात केवळ अमृत मिळते. पृथ्वीतलावर मात्र पंचपक्वान्ने मिळतात. त्यामुळे पृथ्वीतलावरील लोक लंपट,विषयलोलुप आणि पापी असतात. त्यांची ही चर्चा ऐकत बसलेला जक्क त्यांना म्हणाला,’ मला एक संधी द्या, मी पृथ्वीतलावर जाऊन ते सुंदर जग पाहून येतो.’ त्याची ही विनंती ऋषींनी मान्य केली. पण त्याला अशी सक्त ताकीद दिली की,पृथ्वीतलावर गेल्यावर तेथील पंचपक्वान्ने भक्षण करायची नाहीत आणि तेथील सुंदर स्त्रियांवर भुलायचे नाही.   ऋषींची आज्ञा मान्य करून जक्क पृथ्वीतलावर निघाला.

तो पृथ्वीवर येईपर्यंत रात्र झाली होती. आता मुक्काम कोठे करावा असा विचार करीत असता त्याला एक मारीदेवीचे मंदिर दिसले. तेथे त्याने मुक्काम केला आणि अमृत प्राशन करून रागातील सुरावटीत गीत गाऊ लागला. अत्यंत मधुर आवाजातील त्याचे गाणे मारीदेवीला खूपच आवडले. त्याच्यावर खूष होऊन तिने पंचपक्वान्नांचे भोजन तयार केले आणि सोन्याच्या ताटातून त्यास जेवायला वाढले. त्याने मारीदेवीकडे पाहिले . तो म्हणाला,’तू गिरिजा,लक्ष्मी की सरस्वती ?’ ताटातील अन्न पाहून त्याला जेवणाची इच्छा झाली होती,पण तसे केल्यास  सप्तऋषी ठार मारतील या भीतीने तो गप्प राहिला. पण तोपर्यंत पंचपक्वान्नांचा सुवास त्याच्या नाकात गेला होता,ती पंचपक्वान्ने त्याने खाल्ली. त्यावेळी मारीदेवीने त्याला पाहिले, ’हा विष्णू ,शिव की ब्रह्म ?’ असे तिला वाटले.  त्यांच्यामध्ये शरीर संबंध होऊन जे मूल जन्माला आले,तो जोकुमार किंवा जोकमार होय. भाद्रपद शुद्ध अष्टमी या दिवशी जोकुमारस्वामीचा जन्म झाला.  अशारितीने कानडी साहित्यात  जोकुमारस्वामीची जन्मकथा सांगितली आहे.

असे म्हणतात की, जोकुमार जन्मतः प्रौढ होता. जन्मताच त्याने आईला आपल्या पित्याविषयी विचारले,तेव्हा आई म्हणाली,’तुझा बाप कोठे आहे ते मला माहिती नाही,पण तो देवपुरुष होता.’  आईचे म्हणणे ऐकून आपल्या पित्याच्या शोधात जोकुमार घराबाहेर पडला तेव्हा त्याला सुकर्णिका या नावाची एक सुंदर धोब्याची मुलगी दिसली. तिला पाहून जोकुमार तिच्यावर लट्टू झाला. त्याने तिच्याशी लगट सुरु केली,तेव्हा तिच्या बापाने त्याला ठार केले आणि कपडे धुण्याच्या दगडाखाली पुरून टाकले.  ज्यादिवशी त्याचा मृत्यू झाला,तो दिवस भाद्रपद शुद्ध पौर्णिमेचा होता. कर्नाटकात त्या दिवसाला जोकुमार पौर्णिमा या नावाने संबोधले जाते. त्याचे पूजन तेथील लोक मोठ्या भक्तिभावाने करतात.

जोकुमारस्वामीची मूर्ती व पूजाविधी

पूजा करण्याकरिता दैवताची मंदिरे असतात,तशी जोकुमारस्वामीची मंदिरे कोठेही नाहीत. त्याची मूर्ती चिखलापासून कुंभार बनवितात. त्यासाठी शेतातील मळीची माती आणून धोब्याच्या कपडे धुण्याच्या  दगडाखालील गाळ मिसळून मळलेल्या मातीतून जोकुमारची मूर्ती बनविली जाते. साधारणपणे फूटभर उंचीच्या या मूर्तीचे स्वरूप मांडी घातलेल्या स्थितीत नग्नावस्थेचे असते.  त्याच्या एका हातात मुळ्यासारख्या आकाराचे शस्त्र तर दुसरा हात आशीर्वचनपर असतो.  त्याच्या शरीराच्या मानाने त्याचे लिंग नजरेत भरेल इतके मोठे व उन्नत अवस्थेतील दाखविले जाते. चेहरा पसरट आणि डोळे मोठे व बटबटीत असतात. त्याच्या डोक्यावर सोनेरी रंगाचा मुकुट किंवा फेटा आणि कपाळावर विभूतीचा आडवा पट्टा असतो. त्यावर हळदीकुंकवाचा मळवट भरलेला असतो.  त्याच्या टोकदार मिशांवरून तो लढवय्या असल्याचे दिसून येते. गळ्यात काळ्या दोऱ्यात ओवलेला ताईत आणि अंगावर शेला असतो. सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील जोकुमाराच्या मूर्तीला कुंची,टकुचे लहान मुलाचे कपडे घालतात अशी नोंद डॉ.शिंदे यांनी केलेली आहे. कर्नाटकातील काही गावांमध्ये ‘पडवळ’ ही भाजी जोकुमार म्हणून पूजिली जाते तसेच चौका-चौकात पुरुष लिंगाच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करून सात दिवस जोकुमारस्वामीचा उत्सव पाळला जातो. पडवळ हे सापाचे तसेच पुरुष जननेन्द्रीयाचे प्रतीक आहे असे मानले जाते . सिग्मंड फ्राईडने यावर विस्तृत विवेचन केले आहे.

गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर जोकुमारस्वामीची प्रतिष्ठापना केली जाते. परंतु गणपती आणि जोकुमार यांची दृष्टभेट होऊ नये म्हणून जोकुमार स्वामीची मूर्ती आणताना गणपतीची मूर्ती झाकून ठेवली जाते.

कुंभाराच्या घरून कोळी स्त्रिया जोकुमारस्वामीची मूर्ती घेऊन येतात. फोकाने विणलेल्या आणि शेणाने सारवलेल्या टोपलीत कडूनिम्बाचा पाला पसरून आणि  त्यावर रिकामे मडके झाकून त्यावर जोकुमार स्वामीची मूर्ती ठेवली जाते. तिच्या शेजारी राख असलेले खापराचे एक भांडे असते. गोड्या तेलाचा दिवा बाजूला लावलेला असतो, अशा स्थितीतील टोपली डोक्यावर घेऊन कोळी स्त्रिया पहिल्यांदा गावातील पाटलाच्या घरी जातात. सुपात धान्य,मीठ,मिरची अर्पण करून जोकुमारच्या तोंडाला आणि लिंगाला लोणी लाऊन पाटलीणबाई जोकुमारस्वामीची पूजा करते. त्यानंतर इतर स्त्रियांना पूजा करण्याकरिता कोळी स्त्रिया  घरोघरी जातात, तेव्हा “जोकुमार आला गं बायांनो” अशी हाळी देतात.    जोकुमार हा शकून सांगणारा देव आहे,अशी श्रद्धा असल्यामुळे त्याची टोपली उचलून स्त्रिया शकून बघतात. टोपली हलकी लागली की,शुभ आणि जड लागली तर ते अशुभ मानले जाते. वांझ स्त्रियांना अपत्य आणि धन धान्याची समृद्धी देणारे दैवत म्हणून जोकुमारची पूजा केली जाते.  ‘ पडवळ ‘ या फळभाजीला जोकुमार या नावानेही संबोधले जाते. ती भाजी नवऱ्याला खाऊ घातली की,नवऱ्याचे प्रेम वाढून तो वीर्यवान होतो, अशी समजूत कर्नाटकात आहे. जोकुमारच्या उत्सवात धोबी,सुतार,कुंभार,लोहार,महार इत्यादी जातीच्या लोकांना विशेष मान असतो.

जोकुमारस्वामीचे विसर्जन

जोकुमारस्वामीचे आयुष्य केवळ सात दिवसांचे असल्यामुळे भाद्रपद शुद्ध अष्टमी ते भाद्रपद पौर्णिमा या काळात कोळी स्त्रिया जोकुमारला डोक्यावर घेऊन गावभर फिरत असतात. या विधीला ‘जोकुमार खेळवणे’ असे म्हणतात. सात दिवसांचे राज्य करणाऱ्या जोकुमारच्या विविध लीला गीतांमधून गात कोळी स्त्रिया फिरत असतात. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी जोकुमारचे विसर्जन केले जाते. म्हणून या पौर्णिमेला ‘जोकुमार पुनीव’ म्हणतात. विसर्जनाच्या दिवशी गोळा झालेल्या धान्याचा स्वयंपाक केला जातो आणि जोकुमारची टोपली अंगणात आणून त्याची हळदी कुंकू लाऊन पूजा केली जाते. त्याच्या समोर दिवा लाऊन त्याला दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो. कोळी स्त्रियांनी अशी पूजा केल्यानंतर कोळी पुरुष अंगावर घोंगडे पांघरून जोकुमारचे टोपले डोक्यावर घेतात. त्याला मिरवणुकीने महारवाड्यातील मरिआइच्या  मंदिरात विसाव्यासाठी आणले जाते. सोबत आणलेला स्वयंपाक तेथे ठेवून जोगतिणी त्याच्या भोवती फेर धरून गाणी म्हणतात. जवळच एका रोऊन ठेवलेल्या बोराच्या काठीला एका जोगतिणीचा पदर मुद्दाम गुंतविला जातो आणि जोकुमाराने तिचा पदर ओढला असा आळ आणून महार लोक जोकुमारचे डोके मुसळाने ठेचून टाकतात. त्यानंतर जोकुमारच्या मूर्तीला (पार्थिवाला) नदीवर नेऊन धोब्याच्या धुण्याच्या दगडाखाली विसर्जित करतात.  जोकुमारस्वामीला आपला पूर्वज मानणाऱ्या धोबी,महार,सुतार,कुंभार,कोळी,जैन,लिंगायत इ.जातीतील लोक त्याच्या मृत्यूचे सुतक पाळतात. शेतकरी वर्गातील अनेक स्त्रिया जोकुमार पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करीत नाहीत.

जोकुमार व गणपती

कानडी साहित्यातील कथेनुसार मृत्यू नंतर जोकुमार स्वर्गात जातो. त्याच्या आधीच तेथे गणपती पोचलेला असतो. त्याने पृथ्वीतलावर सारे काही ठीक आहे अशी खोटी माहिती तेथे दिलेली असते. पण जोकुमारस्वामी पृथ्वीवरील विदारक स्थितीचे वर्णन स्वर्गातील कुबेरापुढे करतो आणि पृथ्वीवर पाऊस पाडण्याची विनंती त्याला करतो. त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पडतो. जोकुमार येऊन गेला की पाऊस पडतो अशी शेतकऱ्यांची धारणा त्यामुळे होते. या धारणेतून जोकुमार हा सुफलीकरणाचे दैवत आहे हे स्पष्ट आहे. त्याच्या ऊर्ध्वलिंगी स्वरूपावरून हे अधिक स्पष्ट होते.

सिंधू संस्कृतीतील पशुपतीच्या मुद्रेवरील शिवाचे उर्ध्वलिंगी स्वरूप सुफलीकरणाचे प्रतीक मानले गेले आहे. त्याचप्रमाणे गजाननाच्या सर्वात प्राचीन मुर्त्या उर्ध्वलिंगी स्वरूपातच आढळलेल्या आहेत.  अफगाणिस्तानमधील काबुल येथील गणेश मूर्ती ही सर्वात प्राचीन मानली जाते. ती उर्ध्वलिंगी आहे. जोकुमार सुद्धा उर्ध्वलिंगी असतो. जोकुमार आणि गणपती यांमधील साधर्म्य त्यामधून स्पष्ट झालेले आहे. ते सांगताना डॉ.विश्वनाथ शिन्दे म्हणतात, ” घराघरात गणपती आणि जोकुमार यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना  करणे आणि विसर्जन करणे हा काळ साधारणपणे सारखाच असलेला दिसतो.  खरे तर माघ शुद्ध चतुर्थी ही गणपतीची जन्मतिथी आहे, त्या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. गणपतीच्या मृत्यूची कथा कोणत्याही पुराणात आढळत नसतानाही अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाचा सोहळा साजरा केला जातो. खरे तर आज जो गणेशोत्सव साजरा केला जातो,तो मुळात जोकुमार उत्सव असला पाहिजे. त्याचे स्वरूप बदलत गेले आणि जोकुमारस्वामीच्या उत्सवाला गणेशोत्सवाचे स्वरूप कालक्रमात प्राप्त झाले असावे.”

गणपतीचे डोके उडवणे आणि जोकुमाराचे डोके ठेचणे याही या दोन दैवतांमधील साम्य सांगणाऱ्या गोष्टी आहेत. लोकपरंपरेने त्याला अधिक लौकिक रूप देऊन त्याचे गणेशाशी नाते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गणपतीचे मूळ शोधण्याच्या दृष्टीने यावर अधिक संशोधन व्हायला हवे. म्हणजे पुराणातील कथांमागील हेतू स्पष्ट होण्यास मदत होईल यात शंका नाही.

जोकुमारविषयक कथांची रचना लोकमानसामधील लैंगिकता आणि तिचे उदात्तीकरण या संकल्पनांवर आधारित आहे. हाच धागा पकडून आपणास मानसशास्त्रीय संशोधनाकडे पाहणे सोपे जाऊ शकते. गणपतीच्या निर्मितीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न अलीकडील मानसशास्त्र अभ्यासक पॉल कोर्टराईट यांनी केलेला आहे. त्याचे स्वरूप कसे आहे,हे याठिकाणी पाहूया.

मानसशास्त्रीय इडीपस सिद्धांत    

गणपतीचे मूळ शोधण्याच्या प्रक्रियेत भाषाविज्ञान,इतिहास, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, भूगोल,पर्यावरणशास्त्र,प्राणीशास्त्र इ. क्षेत्रातील संशोधन पद्धती बहुतांश अभ्यासकांना उपकारक ठरली आहे,यात शंका नाही. परंतु पुराकथांच्या अभ्यासात ज्या संशोधनपद्धतीने अधिक सूक्ष्मता आणली आहे ती मानसशास्त्रीय संशोधनपद्धती होय. सिग्मंड फ्राईड (१८५६-१९३९) या मनोविश्लेषणशास्त्रज्ञाने ती प्रचलित केली . तीमध्ये अधिक भर टाकून फ्राईडचा शिष्य व मित्र कार्ल गुस्ताव युंग (१८७५ – १९६१) याने सामूहिक अबोधाचा सिद्धांत मांडला. व्यक्तीच्या अबोध मनात आदिम अवस्थेतील मानवाने घेतलेल्या अनुभवावर आधारित प्रतिमा जन्मतःच असतात. त्यांना आदिप्रतिमा ( प्रिमॉंर्डीअल  इमेजेस ) असे नाव त्याने दिले. या प्रतिमांच्या अस्तित्वाला आदिबंध( आर्कीटाईप )या शब्दाने त्याने संबोधले. फ्राईड व युंग यांच्यामध्ये या सिद्धांताच्या मांडणीतून मतभेद निर्माण झालेत. फ्राईडच्या मते जन्मतः बालकाच्या मेंदूत कोणत्याही प्रतिमा किंवा धारणा नसतात. जन्मल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून आपण आपले ज्ञान विकसित करीत असतो. अर्थात जन्मतः आपल्या मेंदूची पाटी कोरी असते. याविरुद्ध युंगचे मत होते. त्याने आदिबंधाचे अस्तित्व पुराकथांच्या अभ्यासातून स्पष्ट केले. जगभरातील पुराकथांचे दाखले त्याने त्यासाठी दिलेत,तसे भारतीय पुराकथांचेही दिलेत. त्यावर आधारित पुराकथांच्या या अभ्यासाला आदिबंधात्मक समीक्षा असे म्हणतात.  पुराकथांच्या अभ्यासासाठी फ्राईडच्या मनोविश्लेषण पद्धतीचाही वापर अभ्यासक करतात.  तिचा वापर काही संशोधकांनी केला आहे , त्यापैकी एक आहेत,पॉल कोर्टराईट.

पॉल कोर्टराईट व त्यांचे संशोधन  

अमेरिकेतील अटलांटा येथील एमोरी युनिव्हर्सिटीच्या रिलिजन विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले पॉल कोर्टराईट पूर्वी ग्रीन्सबोरो येथील नॉर्थ क्यारोलीना युनिव्हर्सिटीत अध्यापन करीत होते. त्यांचा अध्यापनाचा आवडता विषय दक्षिण आशियातील धर्म,विशेषकरून हिंदुधर्म हा होता. ‘ एकोणिसाव्या शतकातील धर्मामधील परिवर्तन’ या विषयात त्यांना विशेष रस आहे. त्याचबरोबर ‘ वासाहतिक भारतातील दृश्य संस्कृती ‘ या क्षेत्रात त्यांनी विशेष संशोधन केलले आहे. म्याकमिलन प्रकाशनाने १९८७ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘ एनसायक्लोपिडिया ऑफ रिलिजन ‘ या कोशग्रंथात त्यांनी विविध प्रकारचे लेख लिहिलेले आहेत.  भारतीय संस्कृतीच्या संशोधनासाठी अमेरिकन इंस्टीटयूटकडून त्यांना संशोधनवृत्ती प्राप्त झाली होती.

त्यांच्या ‘ गणेश : लॉर्ड ऑफ ऑब्ष्ट्याकल्स,लॉर्ड ऑफ बिगीनिंग्स ‘ या पुस्तकात त्यांनी सिग्मंड फ्राईडप्रणीत मानसशास्त्रीय संशोधनपद्धतिचा वापर केला आहे.  ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशनसंस्थेने १९८५ मध्ये त्याची पहिली आवृत्ती काढली,तर २००१ मध्ये भारतीय प्रकाशन संस्था मोतीलाल बनारसीदास , वाराणसी यांच्याद्वारे तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. फ्राईडच्या वादग्रस्त इडीपस गंड या संकल्पनेतून त्यांनी गणपतीच्या निर्मितीच्या पुराकथेचे विश्लेषण केले आणि तेही वादाच्या भोवऱ्यात सापडले. ज्या पुराकथेवर हे संशोधन सिग्मंड फ्राईडने केले ती पुराकथा कशी आहे,ते आता पाहू या.

इडीपसची पुराकथा व नाटक   

ग्रीक संस्कृतीमध्ये इडीपसची पुराकथा प्रसिद्ध आहे.  या कथेवर आधारित ‘ इडीपस रेक्स ‘ हे नाटक ‘सोफोक्लीझ’ या ग्रीक नाटककाराने लिहिले. ल्याटिन भाषेत ते ‘ओडीपस रेक्स’ तसेच ग्रीक भाषेत  ‘ओदिपस टायरानोस’ या नावाने ओळखले जाते. एक शोकांतिका म्हणून जगभर ते गाजले. सोफोक्लीझच्या या नाटकाचे भाषांतर मराठी भाषेत पद्मश्री पु.ल.देशपांडे यांनी ‘राजा ओयदीपौस’ या शीर्षकाखाली केले. तसेच  सदानंद रेगे व शांता वैद्य यांनीही हे नाटक ‘राजा इडिपस’ या नावाने मराठीत आणले आहे. हेच नाटक विवेक आपटे यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे.

या नाटकाची कथा थिब्स या शहरापासून सुरू होते. या शहरात प्लेगच्या साथीने थैमान घातले असते. त्यातून वाचण्याकरिता इडीपस आपल्या क्रेऑन या मेहुण्याला डेल्फी या देवतेच्या पुजाऱ्याकडे थिब्सचे भवितव्य विचारण्याकरिता पाठवितो. डेल्फी या देवतेने दिलेल्या भविष्यवाणीनुसार या शहरातच थिब्सचा आधीचा राजा लेईस याचा खुनी असून तो पकडला जाऊन देशाबाहेर हाकलून दिला जाईल,तेव्हाच प्लेगची साथ संपेल.   क्रेऑन इडीपसला हे सांगतो. त्यावर विश्वास न बसलेला इडीपस पैगंबर टायर्सियस याला पाचारण करतो . तो आंधळा असतो व खुन्याचे नाव सांगण्याला नकार देतो. त्यामुळे इडीपस  त्याच्यावरच राजाच्या खुनाचा आरोप लावतो.  त्यावर टायर्सियस घोषणा करतो की, इडीपस हाच खरा खुनी आहे. इडीपसला हे खरे वाटत नाही व तो राजाच्या खुनाची चौकशी सुरू करतो. त्याची पत्नी व नागरिकांच्या सांगण्यानुसार त्याला कळते की,त्याची पत्नी जोकास्टा हीच त्याची आई असून तो मृत राजा लेईस याचा पुत्र आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे-

इडीपसच्या जन्मानंतर आकाशवाणी होते की,त्याच्या हातून आपल्या पित्याचा मृत्यू होणार आहे. हे ऐकून राजा  इडीपसला अरण्यात नेउन मारून टाकावे असा आदेश आपल्या सैनिकांना देतो. परंतु सैनिकांना त्याची दया येऊन ते त्याला गुराख्याकडे सोपवितात. गुराखी त्याला कोरिन्थच्या राजाकडे नेतो. राजा त्याला दत्तक घेऊन लहानाचे मोठे करतो. त्यामुळे त्यालाच इडीपस आपला पिता मानतो. परंतु लेईसच्या सारखीच भविष्यवाणी झाल्यामुळे आपल्या हातून पित्याचा मृत्यू होऊ नये म्हणून इडीपस शहर सोडतो.  शहराच्या बाहेर जाताना त्याला एका चौरस्त्यावरील पुरुषांच्या झुंडीशी सामना करावा लागतो. त्यानंतर एका प्रवाशाशी झटापट होऊन तो त्याला मारून टाकतो.

पुढे थिब्स शहराजवळ आल्यावर त्याला कळते की,स्फिंक्सने शहराला त्रासवून सोडले आहे. ही मानवी मुख व सिंहाचे शरीर असलेली हा स्त्रीरुपी स्फिंक्स म्हणजे महाभारतातील यक्षासारखी कूट प्रश्न विचारणारी आहे. ही स्फिंक्स ग्रीक पुराणांमध्ये उल्लेखित राक्षसी कायमियरा व ऑर्थ्रस यांची कन्या होती. शहरात प्रवेश करणाराला ती कूट प्रश्न विचारते. जर त्याचे उत्तर योग्य वाटले,तर तो प्रवेश देतो; अन्यथा नाही. स्फिंक्स इडीपसला अडवून शहरात जाण्याकरिता कोडे टाकते,परंतु चतुर इडीपस ते सहजपणे सोडवितो. त्यानंतर स्फिंक्सला मृत्यूपथावर पाठवून इडीपस थिब्सचा राजा होतो. आपली सत्ता बळकट करण्याकरिता तो दिवंगत राजा लुईसची विधवा पत्नी जोकाष्टा हिच्याशी विवाह करतो. जोकाष्टाला जेव्हा कळते की, इडीपस हा तिचा पुत्र आहे,तेव्हा ती फाशी घेऊन आत्महत्या करते. आपल्या आईच्या विरहाने व्याकूळ व पश्चात्तापदग्ध झालेला इडीपस आपल्या उपरण्याची पीन डोळ्यात घालून आपले डोळे फोडून घेतो. नंतर क्रेऑनच्या हाती सत्ता येते व इडीपस आंधळ्या भिकाऱ्याच्या रुपात शहरात भटकत राहतो. या कथेवरून फ्राईडने आपले संशोधन पुढे मांडले आहे. इडीपस गंड या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्याच्या या संशोधनाचे स्वरूप थोडक्यात असे-

फ्राईडचा इडीपस गंड सिद्धांत

इडीपसच्या पुराकथेतून  फ्राईडने लहान मुलांच्या वर्तनाचा शोध घेतला. बालकाचे वर्तन इडीपससारखे असते असे तो म्हणतो. मुलगा आईकडे आकृष्ट होतो,तशीच मुलगी वडिलांकडे आकृष्ट होते. ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्या वडिलांकडे आकृष्ट होणाऱ्या इलेक्ट्रा नावाच्या मुलीची पुराकथा आढळते. इलेक्ट्रा या राजकन्येने आपल्या पित्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आपल्या आईचा अतोनात द्वेष केला. तीवरून इडीपस आणि इलेक्ट्रा अशा दोन गंडांची संकल्पना फ्राईडने मांडली.  या संकल्पनेनुसार बालक इडीपस अवस्थेत असताना नाना प्रकारचे चाळे करू लागतो,तेव्हा त्याचे माता-पिता त्याला ‘तुझे लिंग कापून टाकू ‘अशी धमकी देतात ; तसेच प्रसंगी त्याला मारतातही.  अशा या संकटातून बाहेर निघण्याकरिता मुलगा आपल्या मातेप्रती निर्माण झालेले आकर्षण आपल्या मनातच ठेवतो आणि पित्याशी भावनिकरित्या जुळतो. या काळात त्याला पित्याकडून चांगल्या वागणुकीची शिकवण मिळते. त्या शिकवणीशी मुलगा एकरूप होतो. या प्रक्रियेत त्याची इडीपस गंडातून सुटका होते. त्यानंतर विद्यार्थीदशेत तो प्रवेश करतो आणि त्याची कामवासना अप्रकट अवस्थेत जाते. तारुण्यप्राप्तीपर्यंत ती अबोध मनात दडून राहते. या वासनेचे रुपांतर पुढे ‘ पराहम ‘ म्हणजे सद्बुद्धीत होते.

फ्राईड अशा रीतीने मानवाच्या बाल्यावस्थेचे विश्लेषण करीत म्हणतो की,जी व्यक्ती आपल्या बालपणातील इडीपस सारख्या अनुभवांची समस्या निकोपपणे सोडवू शकत नाही,तिच्या मनात पुढे अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण होतात आणि ती मनोविकृतीची बळी ठरते. फ्राईडच्या या संकल्पनेत काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, मानवी जीवन कामप्रेरणेने भरलेले आहे व ही प्रेरणा बालपणातसुद्धा प्रभावी असते. दुसरे म्हणजे ,बालपणातील इच्छा,प्रवृत्ती आणि अनुभवातून होणारे संस्कार जसेच्या तसे अबोध पातळीवर कायम राहतात. हे संस्कार मोठेपणी प्रभावीपणे कार्यरत होतात.

फ्राईडच्या या मतांशी काही मानसशास्त्रज्ञांनी आपली असहमती दर्शविली. त्यांचे मत असे होते की, फ्राईडने प्रामुख्याने मनोविकृतांच्या जीवनाचा परामर्श घेतला व त्यावर आधारित चिकित्सा केली, त्यामुळे त्याला त्यात काम प्रवृत्तीचे तांडव दिसून आले. परंतु विकृतांच्या जीवनावरून काढलेले निष्कर्ष सुदृढ लोकांच्या जीवनाला कसे काय लागू पडू शकतील ?  अनेकांनी अनेक प्रश्नचिन्ह इडीपस गंड या संकल्पनेवर निर्माण केले असले तरी तिचा स्वीकार करून पुराकथांची तसेच मानवी वर्तनाची चिकित्सा करणारांची संख्या मात्र मोठी आहे. पॉल कोर्टराईट हे त्यांच्यापैकी एक आहेत.

कोर्टराईटचे गणपतीविषयक संशोधन  

कोर्टराईटच्या गणपतीविषयक इडीपस गंडावरच्या संशोधनाचा परामर्श पुरातत्त्व संशोधक पद्मश्री डॉ.म.के.ढवळीकर यांनी आपल्या ‘श्रीगणेश :  आशियाचे आराध्य दैवत’ या पुस्तकात  पृ.२९ वर घेतला आहे. ते म्हणतात,’पॉल कोर्ट राईट या अमेरिकन विद्वानाने ‘गणेशाचा शिरच्छेद’ या आपल्या लेखात वराह पुराणातील मिथकाच्या आधारे गणेशजन्मासंबंधी विवेचन केले आहे.ते अत्यंत विवादास्पद असल्यामुळे त्याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. वराह पुराणातील ( २३.३.२५) कथा खालीलप्रमाणे आहे :

एकदा सर्व देव योगसाधना करीत होते,परंतु त्यापैकी काही देवांनी शिवाकडे त्याबद्दल तक्रार केली आणि अशा लोकांच्या साधनेत विघ्ने निर्माण करावीत अशी विनंती केली. तेव्हा शिवाच्या विचारातून एक मानवी आकृती निर्माण झाली. तो एक अत्यंत देखणा बालक होता. शिवासारखाच तो तेजस्वी होता आणि शिवाचे सर्व गुण त्याच्यात होते. पार्वतीने तो पाहिला आणि त्याच्याकडे ती पाहतच राहिली. त्यामुळे शिवाचा मत्सर जागृत झाला . त्याने त्या बालकाला शाप दिला की तो तुंदिलतनु होऊन,त्याचे शिर हत्तीचे असेल आणि त्यामुळे तो कुरूप दिसेल. त्याने नंतर गजमुखी विनायक निर्माण केले,आणि त्या बालकाला त्यांचा अधिपती नेमले.

या कथेचा अन्वयार्थ कोर्टराईट यांनी कसा लावला आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. ते लिहितात :

“ गणेश शिवासारखा निर्माण झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. पार्वती त्याच्याकडे अनिमिष नेत्राने पाहत राहिली,कारण तो हुबेहूब शिवाची दुसरी आवृत्ती होता. त्यामुळे शिव तिच्याकडे पाहत राहिला. पार्वतीच्या मनात त्या बालकाबद्दल भलतेसलते विचार आले असावेत अशी शिवाला शंका आली आणि त्याचा कोप अनावर झाला. त्यामुळे बालक कुरूप होईल असा तो शाप देतो. त्यामुळे तो तुंदिलतनू होतो आणि त्याचे शिर हत्तीचे होते.  इतकेच नव्हे तर,शिव आणखी हत्तीचे शिर असलेले गण त्याच्या घामातून निर्माण करतो. या गजमुख विनायकांच्या सेनेचा अधिपती म्हणून गणेशाची नेमणूक होते.

कोर्टराईट याच्या पुढे जातात. त्यांना एक एकोणिसाव्या शतकातील वराहपुराणाचे (?) इंग्रजी भाषांतर सापडले. त्यात एक गणेशासंबंधी कथा आहे असा त्यांचा दावा आहे,परंतु ती वराहपुराणात आढळत नाही. तरीसुद्धा त्या कथेचा उपयोग करून त्यांनी गणेश जन्मासंबंधीचा ‘एडीपस’ सिद्धांत मांडला आहे. खरे म्हणजे कोर्टराईट विश्वास ठेवतात ती कथा विश्वासार्ह नसल्यामुळे त्यांच्या सिद्धांताचा पाया ढासळतो. तरीसुद्धा हा गर्हणीय सिद्धांत त्यांनी मांडला आहे. ते लिहितात :

“ इतर सर्व कथांप्रमाणे या कथेतही गणेशाची निर्मिती शिव स्वतःपासून करतो. पार्वती त्या देखण्या बालकाकडे अनिमिष नेत्राने पाहत राहते. स्वर्गातल्या इतर स्त्रियाही त्या बालकाकडे पाहत राहतात. पार्वतीच्या मनात मत्सराची भावना उत्पन्न होते आणि ती त्या बालकाला कुरूप होईल असा शाप देते. इतर कथांमध्ये शिव मत्सराने त्या बालकाला शाप देतो असे सांगितले आहे. परंतु पार्वतीच्या मनातील तीव्र मत्सर हा कामवासनेपोटी उत्पन्न झाल्याचे निदर्शक आहे. गणेशासंबंधीच्या दोन्ही प्रकारच्या मिथकात काही साम्य आहे. गणेशाची निर्मिती त्याच्या पित्याने केल्यामुळे तो हुबेहूब पित्यासारखा दिसतो. त्यामुळे शिव-पार्वतीत दुरावा होतो,परिणामी गणेश कुरूप बनतो आणि शिवापेक्षा वेगळा दिसतो. प्रस्तुत कथेत बालकाचे शिर उडविण्याचा प्रसंग नसला तरी त्याला हत्तीचे शिर मिळते.”

ज्या कथेवर अवलंबून कोर्टराईट यांनी आपला सिद्धांत मांडला आहे,ती मूळ वराहपुराणात सापडत नाही आणि तेव्हा ती विश्वसनीय मानता येणार नाही,शिवाय कोर्टराईट यांना त्या कथेचे एकोणिसाव्या शतकातील भाषांतर हाती लागले. तेव्हा त्यांचा हा सिद्धांत मान्य होण्यासारखा नाही. मूळ वराहपुराणात (२३.२-२५) बाळ गणेशाच्या गोंडस सौंदर्याचा शिवाला मत्सर वाटतो असे वर्णन आहे , हे आपण समजू शकतो. इतकेच नव्हे,तर पार्वतीने त्याला इतर स्त्रियांची दृष्ट लागू नये म्हणून कुरूप होण्याचा शाप देणे हेही अशक्य नाही.’

कोर्टराईट यांचा इडीपस गंडाचा सिद्धांत मूळ वराहपुराणात न आढळणाऱ्या कथेवर आधारित असल्यामुळे गणेश जन्माच्या कथेशी लागू होत नसल्याबद्दलचे आपले मत डॉ.ढवळीकर यांनी वरीलप्रमाणे व्यक्त केलेले आहे. परंतु या कथेत शिवाला बाळ गणेशाच्या गोंडस सौंदर्याचा मत्सर वाटतो आणि पार्वतीने त्याला इतर स्त्रियांची दृष्ट लागू नये म्हणून कुरूप होण्याचा शाप दिला या बाबी मान्य केल्या आहेत.  वास्तविक कोणत्याही माता-पित्याला आपल्या अपत्याबद्दल अशा भावना निर्माण होणे अस्वाभाविक आहे. दैवी माता – पित्याला तसे वाटू शकते हे याठिकाणी गृहित धरलेले आहे.  मनोवैज्ञानिकदृष्ट्याही तसे घडू शकते. परंतु,पुराकथांमधून अशी जी वर्णने आढळतात,त्यामागे मात्र दुसऱ्याच एखाद्या घटनेचे स्पष्टीकरण देणे हा हेतू असतो. या कथेतून दोन गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिले म्हणजे गणेश हा शिवासारखा होता किंवा गणेश व शिव हे एकच होत. दुसरे म्हणजे गणेशाच्या धडावर हत्तीचे शिर का लागले असावे. पुराकथांच्या अभ्यासकांनी  तसेच इतिहास संशोधकांनी या दोनही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गणपती आणि शिव यांच्या वर्णनातील साम्यावरून ती एकाच दैवताची दोन रूपे आहेत असे इतिहाससंशोधक मानतात. त्याचप्रमाणे गणेशाच्या शिरावर हत्तीचे शिर म्हणजे हत्ती कुलचिन्ह होय असे पुराकथांचे अभ्यासक मानतात.

कुलचिन्हवादाचा सिद्धांत मानवशास्त्राच्या अभ्यासात महत्वाचा आहे. यावर अनेक समाजशास्त्रज्ञांनी आजवर आपापली निरीक्षणे मांडून त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यामुळे तो सर्वमान्य झालेला आहे. गणपतीचे मूळ शोधतानाही आपणास याच सिद्धांताचा आश्रय घ्यावा लागतो. मिथकांच्या अभ्यासात तर या सिद्धांताने फार मोठी जबाबदारी पार पडली आहे,यात शंका नाही. भारतात जशा प्राचीन परंपरा अजूनही कायम आहेत,तशाच त्यांच्याशी संबंधित विधिनाट्ये आणि मूर्तीशिल्पेही उपलब्ध आहेत. त्यामुळे मिथकांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. गणपतीच्या गजमुखाचेही स्पष्टीकरण देण्यासाठी आपणास या पुरातात्विक अवशेषांची मदत होते,हे मात्र निश्चित.

 

पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 1 गण

दूसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 2   कुल व गण परस्परसंबंध

तिसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 3  गणिका व गणपती

 

 

 

लेखक-  प्रा. डॉ. अशोक राणा

 हे मुर्तीशास्त्राचे अभ्यासक आहेत. 
भारतीय मिथक शास्त्रावर त्यांचा
गाढा अभ्यास आहे.

 

 

 

 

 

हे पण वाचा

बैलपोळा भारतीय कृषी संस्कृतीतील अब्राह्मणी सण. बैलपोळा 2024

मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 1 

मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 2

Malegaon protest – मालेगाव निषेध आंदोलन, 1

 

आमचे विडियो पाहण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा

YouTube – kanokan News

Instagram- kanokan News

Facebook- kanokan Topics

Exit mobile version